बार्शीटाकळी पंचायत समितीच्या लाचखोर गटविकास अधिकाऱ्यासह कनिष्ठ सहायक अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 10:23 AM2020-09-11T10:23:44+5:302020-09-11T10:24:00+5:30
१५ हजार रुपयांची लाच मागितल्याने या दोन्ही लाचखोरांना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १५ हजारांची लाच स्वीकारताना गुरुवारी सायंकाळी रंगेहाथ अटक केली.
अकोला : बार्शीटाकळी पंचायत समितीचा प्रभारी गटविकास अधिकारी गोपाल राजाराम बोंडे व कनिष्ठ सहायक अनंत तुळशीराम राठोड या दोघांनी तक्रारदाराच्या रजा मंजूर करून त्याचे देयक काढण्यासाठी तब्बल १५ हजार रुपयांची लाच मागितल्याने या दोन्ही लाचखोरांना अकोलालाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १५ हजारांची लाच स्वीकारताना गुरुवारी सायंकाळी रंगेहाथ अटक केली. या दोघांनी तक्रारदाराच्या अकोला येथील खेतान नगरमधील घरी जाऊन लाच स्वीकारल्याची माहिती समोर आली आहे.
बार्शीटाकळी पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेल्या तसेच न्यू खेतान नगरमधील प्राजक्ता कन्या शाळेजवळील रहिवासी ५० वर्षीय तक्रारदाराच्या रजेच्या कालावधीमधील रजा मंजूर करून त्याचे देयक मंजूर करण्याकरिता बार्शीटाकळी पंचायत समितीचा प्रभारी गटविकास अधिकारी गोपाल राजाराम बोंडे रा. सहकार नगर अकोला व कनिष्ठ सहायक अनंत तुळशीराम राठोड रा. दगडपारवा ता. बार्शीटाकळी या दोघांनी १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली; मात्र तक्रारकर्त्यास लाच देणे नसल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. यावरून अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १९ जून रोजी पडताळणी केली असता, या दोघांनीही १५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले. त्यानंतर तब्बल चार महिन्यांनी या दोघांनी तक्रारदाराच्या न्यू खेतान नगरातील निवासस्थानी गुरुवारी १५ हजार रुपयांची लाच घेताना सापळा रचून असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख शरद मेमाने व त्यांच्या पथकाने दोन्ही लाचखोर आरोपींना अटक केली. त्यानंतर या दोन्ही लाचखोरांविरुद्ध खदान तसेच बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस उप-अधीक्षक शरद मेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल इंगळे, प्रदीप गावंडे, सुनील येलोने, सलीम खान व इम्रान यांनी केली.
शासकीय कार्यालय लाचखोरांचा अड्डा
बार्शीटाकळी तालुक्यातील पंचायत समिती तसेच शिक्षण विभाग यासह कृषी विभाग व भूमी अभिलेख विभाग सध्या लाचखोरांचा अड्डा बनला आहे. या ठिकाणच्या तक्रारी वारंवार करण्यात येत आहेत; मात्र भूमी अभिलेख विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथील लाचखोरांची पाठराखण सुरू केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. प्रत्येक टेबलवर ५०० तसेच हजार रुपयांची मागणी या कार्यालयामध्ये करण्यात येत असल्याचीही माहिती आहे.