४ आॅक्टोबरपर्यंतच्या पटसंख्येच्या आधारावर संचमान्यता होणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 01:50 PM2018-10-06T13:50:33+5:302018-10-06T13:52:24+5:30
यंदा ४ आॅक्टोबरपर्यंतची स्टुटंड पोर्टलवरील पटसंख्या विचारात घेऊन संचमान्यता करण्यात येणार आहे.
अकोला : २0१८-१९ वर्षाच्या संचमान्यतेसाठी सर्व माध्यमांच्या शाळांमधील पटसंख्या स्टुडंट पोर्टलवर टाकावी लागते. यंदा ४ आॅक्टोबरपर्यंतची स्टुटंड पोर्टलवरील पटसंख्या विचारात घेऊन संचमान्यता करण्यात येणार आहे.
शाळांची संचमान्यतेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थी पटसंख्या, अतिरिक्त शिक्षक, विषयनिहाय पदे आणि रिक्त पदे आदी माहिती लक्षात येते. संचमान्यतेची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया राबविण्यात येते. ही आॅनलाइन माहिती दिल्यामुळे एकूणच शाळांमधील स्थिती लक्षात येणार आहे. विद्यार्थी संख्येनुसार शाळांमधील शिक्षकांची संख्या लक्षात येईल. त्यावरून अतिरिक्त शिक्षक, शाळेतील रिक्त पदांची संख्या समोर येईल. या दृष्टिकोनातून महत्त्वाची असणारी २0१८-१९ ची संचमान्यता ही ३0 सप्टेंबरपर्यंत स्टुडंड पोर्टलवर आॅनलाइन टाकण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारे करण्यात येणार होती; परंतु तांत्रिक अडचणींमुळे ही संचमान्यता आता ३0 सप्टेंबरऐवजी ४ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजतापर्यंत स्टुटंड पोर्टलवरील विद्यार्थी पटसंख्येच्या आधारे करण्यात येणार आहे. त्यानंतर आॅनलाइन टाकण्यात आलेली विद्यार्थ्यांची पटसंख्या गृहीत धरल्या जाणार नाही. संचमान्यतेच्या कामासाठी वेळापत्रकसुद्धा देण्यात आले आहे. शाळा लॉगिनमधून केंद्रप्रमुख लॉगिनला विद्यार्थ्यांची माहिती ४ ते १५ आॅक्टोबरपर्यंत द्यावी लागणार आहे, तसेच केंद्रप्रमुख लॉगिनमधून शाळेने पाठविलेली विद्यार्थ्यांची माहिती ४ ते १८ आॅक्टोबरपर्यंत अंतिम करण्यासाठी मुदत दिली आहे. (प्रतिनिधी)
आॅनलाइन टाकण्यात आलेली विद्यार्थी पटसंख्येची माहिती ही ४ आॅक्टोबरपर्यंत गृहीत धरण्यात येईल. त्यापुढील पटसंख्या संचमान्यतेसाठी लक्षात घेतली जाणार नाही. विद्यार्थी संख्येनुसार शाळांमधील शिक्षकांची संख्या लक्षात येईल.
- प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी,
माध्यमिक जि.प. अकोला.