कर्णबधिरांना मिळणार ‘डिजिटल क्लासरूम’चा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 01:21 AM2017-08-14T01:21:36+5:302017-08-14T01:21:46+5:30
अकोला: कर्णबधिर मुलांसाठीच्या एकवीरा बाल विकास केंद्रात डिजिटल क्लासरूम कार्यान्वित करण्यासाठी युवाराष्ट्र व एमएसईबी अभियंता सह. पतसंस्थेच्यावतीने मदतीचा हात म्हणून रविवारी ७५ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: कर्णबधिर मुलांसाठीच्या एकवीरा बाल विकास केंद्रात डिजिटल क्लासरूम कार्यान्वित करण्यासाठी युवाराष्ट्र व एमएसईबी अभियंता सह. पतसंस्थेच्यावतीने मदतीचा हात म्हणून रविवारी ७५ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.
श्रीकांत व सुचिता बनसोड हे कर्णबधिर मुलांसाठी उपचारप्रक्रिया व या मुलांमध्ये सर्वांंगीण क्षमतांचे निर्माण करून त्यांना सर्वांंगीण बाल विकासाच्या मुख्य धारेत आणण्याच्या उद्देशाने एकवीरा बाल विकास केंद्र चालवतात. बालकांमध्ये कर्णबधिरत्व हे लवकर लक्षात न येणारे वेगळ्या स्वरूपाचे व तेवढेच गंभीर व्यंग आहे. असे असले तरी त्वरित योग्य उपचार आणी विशेष प्रशिक्षण सुविधा लाभल्यास या मुलांना सर्वांंगीण विकासाकडे नेता येऊन स्वावलंबी बनवता येऊ शकते. मुलांच्या सर्वांंगीण विकासाच्या प्रक्रियेला हातभार लागावा म्हणून इथे द्रुकश्राव्य माध्यमातून शिक्षण देण्यासाठी डिजिटल क्लासरूम असावी, अशी भावना बनसोड दाम्पत्यांनी युवाराष्ट्रचे डॉ. नीलेश पाटील यांच्याकडे बोलून दाखविली होती. तेव्हा युवाराष्ट्रने एकवीराच्या या अनोख्या प्रयासाच्या सादेला प्रतिसाद देण्याचे ठरवले. याच प्रयासादरम्यान युवाराष्ट्रचे डॉ. नीलेश पाटील यांनी आपल्या सामाजिक बांधीलकीमध्ये अग्रेसर असलेल्या अकोल्यातील एमएसईबी अभियंत्यासह पतसंस्थेला या संबंधी पत्र लिहून योगदान देण्याची विनंती केली असता एमएसईबी अभियंता सह. पत संस्थेचे चेअरमन इंजि. संतोष खुमकर, सबऑर्डिनेट इंजिनिअर्स असोशिएशनचे इंजि विनय शिंदे यांच्यासह पतसंस्था व असोशिएशनच्या सर्व पदाधिकार्यांनी या डिजिटल क्लासरूमसाठी आर्थिक तरतूद आपल्या सामाजिक बांधीलकी निधीतून करण्याची मान्यता दिली. एकवीरा संस्थेला भेट देऊन पतसंस्थेचे चेअरमन इंजि संतोष खुमकर,सबऑर्डिनेट इंजि.असोशिएशनचे इंजि. विनय शिंदे, व्यवस्थापक उल्हास गोतमारे युवाराष्ट्रचे डॉ. नीलेश पाटील यांनी कोटेशननुसार ७५ हजार रुपयांचा धनादेश संचालिका सुचिता बनसोड यांच्यासह विद्यार्थ्यांंना बहाल केला. या निधीतून बाल विकास केंद्रात १५ ऑगस्ट रोजी डिजिटल क्लासरूम कार्यान्वित होणार आहे.