बीडीओ बचुटेंच्या अटकेची शक्यता
By admin | Published: June 12, 2016 02:45 AM2016-06-12T02:45:43+5:302016-06-12T02:45:43+5:30
रोजगार हमी योजनेच्या कामात गैरव्यवहार केल्याचा आरोप असलेले अकोला पंचायत समितीचे तीन अधिकारी पोलिसांच्या रडारवर.
बोरगाव मंजू (जि. अकोला): महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेच्या कामात गैरव्यवहार केल्याचा आरोप असलेले अकोला पंचायत समितीचे तीन अधिकारी पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती मिळाली आहे. या तीनही अधिकार्यांनी उच्च न्यायालयातून २0 तारखेपर्यंत तात्पुरता जामीन प्राप्त केला आहे. या अपहार प्रकरणात या आरोपींची मोठी भूमिका आहे अशी माहिती पोलिसांच्यावतीने उच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहे. आरोपींचा जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न चालविले आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी गटविकास अधिकारी देवीदास बचुटे यांच्या अटकेची शक्यता बळावली आहे. प्रकृती अस्वस्थेमुळे बचुटे रुण्णालयात दाखल असून या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहे. यामुळे रुग्णालयातून सुटी होताच बचुटे पोलिसांच्या ताब्यात असतील, अशी माहिती बोरगाव मंजूचे ठाणेदार भास्कर तवर यांनी दिली. सन २0१३ ते १४ या कालावधीत बोरगाव मंजू परिसरात नऊ शेतरस्त्याचे काम करण्यात आले होते. शासकीय निधीचा योग्य प्रकारे वापर व्हावा यासाठी सहायक कार्यक्रम अधिकारी आनंद जानोदकर व सहायक लेखाधिकारी गणेश कहार यांच्यासह वरिष्ठ अधिकार्यावर जबाबदारी होती; मात्र जानोदकर व कहार यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केल्याचे उघड झाल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला व त्यांना अटक करण्यात आली. या अपहार प्रकरणात अकोला पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी बचुटे यांची भूमिका असल्यामुळे पोलिसांना त्यांना चौकशीसाठी बोलावले होते; मात्र रक्तदाब वाढल्याचे कारण करू न बचुटे रुग्णालयात दाखल झाले आहेत. या प्रकरणात आतापर्यंंत दोन अधिकार्यांना अटक झाली असून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली.