टीव्हीसमोर बसून जेवत असाल तर सावधान; पोटविकार वाढण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:14 AM2021-06-17T04:14:32+5:302021-06-17T04:14:32+5:30
पोटविकार टाळायचे असतील तर...! जेवण करताना मानसिकदृष्ट्या आपण त्यात गुंतणं आवश्यक आहे. टीव्ही, मोबाईल बघत जेवण सुरू असेल तर ...
पोटविकार टाळायचे असतील तर...!
जेवण करताना मानसिकदृष्ट्या आपण त्यात गुंतणं आवश्यक आहे. टीव्ही, मोबाईल बघत जेवण सुरू असेल तर त्याचा पचनक्रियेवर भलताच परिणाम जाणवतो. मानसिकदृष्ट्या जेवणात आपण एकरूप नाही झालो तर लाळ तयार होण्याची प्रक्रिया मंदावते. लाळ जेवढी चांगली जेवणात मिसळते, तेवढे चांगले पचन होते. बाहेरचे पदार्थ खाणे टाळावे, अस्वच्छ ठिकाणी बसून तसेच न शिजलेले अन्न खाऊ नये.
मुलांच्या जेवण पद्धतीवर विशेष लक्ष
जेवण करताना मुलांना शक्यतोवर मोबाईल दिला जात नाही तसेच त्यावेळी टीव्ही लावला जात नाही. आम्ही स्वयंपाकघरातच जेवतो. कधी कधी मुलं मोबाईल, टीव्हीचा हट्ट धरतात. त्यावेळी मुलांना समजावणे कठीण होऊन जाते.
- निशा अनासुने,
गृहिणी, अकोला
टीव्हीसमोर बसून कधी कधी मुले जेवण करतात. शक्यतोवर स्वयंपाकघरात बसूनच जेवण केले जाते. सर्व सोबत जेवण करीत असतो, त्यावेळी टीव्ही पाहणे टाळले जाते. इतर वेळी मात्र टीव्ही पाहण्याचा मोह मुलांना आवरत नाही.
- पूनम पडोळे, गृहिणी, अकोला
मुलांच्या आहारावर विशेष लक्ष असते. मात्र, कधी कधी मुले टीव्ही व मोबाईलचा हट्ट धरतात. शक्यतोवर जेवताना मुलांना मोबाईल किंवा टीव्ही पाहू दिला जात नाही. त्यावेळी मुले जास्त हट्टी होतात.
- हर्षा ताठे, गृहिणी, अकोला
अन्न व्यवस्थित पचन होण्यासाठी शक्यतोवर टीव्हीसमोर बसून किंवा मोबाईल देऊन मुलांना जेवण न दिलेले केव्हाही चांगले. टीव्ही, मोबाईलची सवय मोडली तर मुले व्यवस्थित जेवण करतील. पर्यायाने पोटाच्या समस्या उद्भवणार नाहीत.
- डॉ. विनीत वरठे, बालरोग तज्ज्ञ, जीएमसी, अकोला