गोरक्षण रोडवर जरा सांभाळून, पुढे खड्डे आहेत! जीवघेणे खड्डे, कारचे चाक निखळले
By नितिन गव्हाळे | Published: July 15, 2024 09:03 PM2024-07-15T21:03:10+5:302024-07-15T21:03:31+5:30
मनसेचा आंदोलनाचा इशारा
नितीन गव्हाळे, अकोला: गोरक्षण रोडवर वाहने चालविताना जरा सांभाळातूनच राहिले पाहिजे. नेहरू पार्क चौक ते संत तुकाराम चौकापर्यंतच्या काँक्रीटच्या रस्त्यावर खड्डे पडलेले आहे. अनेक ठिकाणी जीवघेणे खड्डे असल्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. सोमवारी या खड्ड्यांमुळे एका कारचे चाक निखळल्याची घटना घडली. रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनपा आयुक्तांकडे केली आहे.
८ ते १० वर्षांपूर्वी काँक्रीटचा रोड बनविण्यात आला. नेहरू पार्क चौक ते संत तुकाराम चौकापर्यंत काँक्रीटचा रस्ता निर्माण करण्यात आला. परंतु आता या रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, अनेक ठिकाणी रस्त्याला भेगा गेल्या आहेत. वाहनचालकाला खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. यासोबतच अनेकांना मणका, कंबर, पाठदुखीचे त्रास होत असल्याचे सांगण्यात येत आहे. या रस्त्यावरील खड्ड्याचा आकार आणि खोली जास्त असल्याने वाहने उलटल्याशिवाय राहणार नाही, अशी स्थिती आहे.
रस्त्याच्या मधोमध हे खड्डे असून, नेहरू पार्क ते इन्कमटॅक्स चौकापर्यंत २० ते २५ असे मोठे खड्डे पडलेले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी भरल्यास चालकांचे दुर्लक्ष झाल्याने मोठी घटना घडल्याशिवाय राहणार नाही. या खड्ड्यांच्या संदर्भात मनसेचे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे एखाद्याचा जीव गेल्यास कोण जबाबदारी घेणार आहे, असा प्रश्न करीत, महापालिका प्रशासनाने तातडीने खड्डे बुजवून रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.