जि. प., पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी तयार राहा!- राज्य निवडणूक आयुक्तांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:19 PM2019-07-24T12:19:44+5:302019-07-24T12:19:51+5:30
अकोला: बरखास्त करण्यात आलेल्या पाच जिल्हा परिषदांसह त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी तयार राहण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी मंगळवारी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे दिले.
अकोला: बरखास्त करण्यात आलेल्या पाच जिल्हा परिषदांसह त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी तयार राहण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी मंगळवारी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे दिले.
नागपूर, अकोला, वाशिम, धुळे व नंदुरबार या पाच जिल्हा परिषदांसह त्या अंतर्गत पंचायत समित्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर देण्यात आलेली मुदतवाढ याआधीच संपुष्टात आली होती. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या जिल्हा परिषदांना मुदतवाढ देण्यास नकार दिला होता. त्यानुषंगाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नागपूर, अकोला, वाशिम, धुळे व नंदुरबार या पाच जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत पंचायत समित्या राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागामार्फत १८ जुलै रोजी बरखास्त करण्यात आल्या असून, जिल्हा परिषदांचा कारभार हाकण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाºयांना (सीईओ) प्रशासक म्हणून तसेच संबंधित गटविकास अधिकाºयांना पंचायत समितींचे प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
बरखास्त करण्यात आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका लवकरच घेण्यात येणार आहेत. त्यानुषंगाने राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी २३ जुलै रोजी नागपूर, अकोला, वाशिम, धुळे व नंदुरबार या पाचही जिल्हाधिकाºयांसह संबंधित अधिकाºयांची ‘व्हिडिओ कॉन्फन्स’ घेतली. पाचही जिल्हा परिषदांसह त्या अंतर्गत पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी तयार राहण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी संबंधित पाचही जिल्हाधिकाºयांना दिले. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसदर्भात इतर विषयांवरही राज्य निवडणूक आयुक्तांनी अधिकाºयांकडून माहिती घेतली. राज्य निवडणूक आयुक्तांच्या या ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’मध्ये अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले सहभागी झाले होते.
पूर्वतयारीचा अहवाल तातडीने सादर करा!
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देशही राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी पाचही जिल्हाधिकाºयांना ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे दिले.