मतमोजणीसाठी सज्ज राहा - जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 02:19 PM2019-05-04T14:19:31+5:302019-05-04T14:19:56+5:30
मतमोजणीसाठी संबंधित यंत्रणांनी सज्ज राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शुक्रवारी दिले.
अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी २३ मे रोजी शहरातील मंगरुळपीर रोडवरील खदानस्थित शासकीय गोदाम येथे होणार असून, मतमोजणीसाठी संबंधित यंत्रणांनी सज्ज राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शुक्रवारी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मतमोजणी पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, महानगरपालिका आयुक्त संजय कापडणीस, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी राम लठाड, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश अपार, अभयसिंह मोहिते, उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे उपस्थित होते. मतमोजणीसाठी पूर्वतयारीचा आढावा घेत, मतमोजणीच्या ठिकाणी अकोला लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय कक्ष तयार करण्यात येणार असून, ओळख तपासूनच मतमोजणीच्या ठिकाणी प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणूक निरीक्षकांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात येणार असून, मतमोजणी परिसरात बॅरिगेट्स लावण्यात येणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने मतमोजणी परिसरातील प्रमुख रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून, मतमोजणीच्या ठिकाणी विद्युत पुरवठा व ध्वनिक्षेपक व्यवस्था, जनरेटरची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करुन मतमोजणी प्रक्रियेसाठी सज्ज राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या. या बैठकीला जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.