रेतीचा ढीग उचलण्यावरून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:19 AM2021-01-25T04:19:42+5:302021-01-25T04:19:42+5:30
अकाेला : रस्त्यावर टाकलेला रेतीचा ढीग उचलण्यास सांगितले असता, घरी जाऊन मारहाण करण्यात आली, या तक्रारीवरून खदान पोलिसांनी मारहाण ...
अकाेला : रस्त्यावर टाकलेला रेतीचा ढीग उचलण्यास सांगितले असता, घरी जाऊन मारहाण करण्यात आली, या तक्रारीवरून खदान पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. ही घटना एसटीच्या विभागीय कार्यालयामागे घडली.
आशिष ढोमणे (वय ३६, रा. आनंद गृहनिर्माण सोसायटी, एसटी विभागीय कार्यालयाच्या मागे, कौलखेड) यांनी खदान पोलीस ठाण्यात याविषयीची तक्रार दिली आहे. त्यानुसार २० जानेवारीच्या रात्री आठ वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर रेतीचा ढीग पडलेला असल्याने ढाेमणे यांनी तेथील चौकीदाराला रेतीचा ढीग उचलण्यास सांगितले. चौकीदाराने त्याचा मालक संतोष म्हैसने (रा. मलकापूर) यांना याविषयी सांगितले. त्यानंतर म्हैसने यांनी ढोमणे यांच्या मोबाइलवर फोन करून धमकी दिली व अनोळखी तीन व्यक्तींना घेऊन रात्री १२ वाजता ढोमणे यांच्या घरी आले. यावेळी ढोमणे यांच्या घरात घुसून त्यांना बाहेर काढत मारहाण करण्यात आली. यावेळी त्यांची पत्नी व आईलाही धक्काबुक्की करण्यात आली. त्यानंतर मारहाण करणाऱ्यांनी घरातील सामानाचीही नासधूस केली व ढोमणे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. ढोमणे यांच्या तक्रारीवरून खदान पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४५२, ४२७,३२३,५०४,५०६नुसार गुन्हा दाखल केला आहे.