अगरवेसचा शिकस्त भाग जमीनदोस्त
By admin | Published: September 15, 2016 03:12 AM2016-09-15T03:12:37+5:302016-09-15T03:12:37+5:30
दगडी पुलानजिकच्या अगरवेसचा शिकस्त भाग महापालिका प्रशासनाने बुधवारी जमीनदोस्त केला.
अकोला, दि. १४- दगडी पुलानजिकच्या अगरवेसचा शिकस्त भाग कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता लक्षात घेता महापालिका प्रशासनाने बुधवारी शिकस्त भाग जमीनदोस्त केला. या मार्गावरील गणेश विसर्जन मिरवणूक ध्यानात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्यावतीने शहराच्या विविध भागातून परंपरेनुसार मिरवणूक काढली जाते. मिरवणुकीला जय हिंद चौकातून सुरुवात होते. जय हिंद चौकातून दगडी पुलाजवळ येण्यापूर्वीच इतिहासकालीन असदगड किल्ल्याची वेस आहे. अगरवेस नावाने ओळखल्या जाणार्या या प्रवेशद्वाराची मागील काही दिवसांपासून दुरवस्था झाली. त्यामध्ये झाडे उगवल्याने ही वेस कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली होती. गणेश विसर्जन मार्गाची पाहणी करत असताना ही बाब जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मनपा आयुक्त अजय लहाने, जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या निदर्शनास आली. मिरवणुकीमध्ये ढोल-ताशे, बॅन्ड पथकांचा समावेश राहतो. त्यांच्या आवाजामुळे शिकस्त वेसचा भाग कोसळण्याची चिन्हं लक्षात घेता, शिकस्त भाग पाडण्यावर प्रशासकीय यंत्रणांनी एकमत केले. त्यानुषंगाने बुधवारी अगरवेसचा शिकस्त व जीर्ण भाग पाडून त्यामधील झाडे काढून घेण्यात आली. यावेळी मनपा आयुक्त अजय लहाने जातीने उपस्थित होते. त्यांच्यासोबत डाबकी रोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद ठाकरे, मनपाचे शहर अभियंता इक्बाल खान, कार्यकारी अभियंता अजय गुजर, क्षेत्रीय अधिकारी दिलीप जाधव व इतर कर्मचारी उपस्थित होते.