आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण; मूर्तिजापूर शहर कॉंग्रेस अध्यक्ष दिनेश दुबे याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 11:53 AM2021-07-17T11:53:05+5:302021-07-17T12:26:54+5:30
Crime News : प्रेम दुबे, सागर दुबे, दिनेश दुबे या तिघांविरुद्ध भादंविच्या ३५३, ३३२, २९४, ५०४, ५०६,३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला.
मूर्तिजापूर : येथील नगर परिषद आवारातील लसीकरण केंद्रावर कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरु असताना उपस्थित दिनेश दुबे व सहकाऱ्यांनी उपस्थित डॉक्टर व कर्मचाऱ्यांना धमकावून मारहाण केल्याची घटना ३१ मे रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली. यासंदर्भात मूर्तिजापूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला; परंतु घटने दरम्यान दिनेश दुबे हा फरार होता व त्याने न्यायालयातून तात्पुरता जामीन मिळविला. त्या नंतर पोलिसांनी दिलेल्या अहवालानुसार न्यायालयाने १६ जुलै रोजी जामीन नामंजूर केला असता तो पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला अटक केली.
३१ मे रोजी सकाळी येथे लसीकरणाचा कार्यक्रम सुरळीत सुरू असताना शहर कॉंग्रेसचा अध्यक्ष दिनेश दुबे आपल्या सहकाऱ्यांसह तेथे पोहोचला. लसीकरणाच्या कारणावरून उपस्थित डॉक्टर हेमंत तायडे यांना आरोपीनी मारहाण करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केला. लसीकरणादरम्यान राडा होऊन लसीकरण ठप्प झाले, तर पोलीसांनी राडा करणाऱ्या प्रेम दुबे, सागर दुबे आरोपींना अटक केली दरम्यान तिसरा आरोपी कॉंग्रेसचा शहर अध्यक्ष दिनेश दुबे फरार झाला होता. दिनेश दुबे हा गुंड प्रवृत्तीचा असून त्याचेवर गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. गत वर्षापुर्वी त्याला तडीपार करण्यात आले होते. तर शासकीय कामात अडथळे निर्माण करण्यासंदर्भात त्याचेवर अनेक गुन्हे दाखल आहेत न्यायालयाने शुक्रवारी त्याचा जामीन रद्द केल्या नंतर तो मलकापूर वरुन रेल्वेने मुंबई येथे पळून जात असताना मूर्तिजापूर शहर पोलीसांनी मलकापूर पोलीसांच्या मदतीने त्याला मलकापूर येथून अटक केली असल्याची माहिती पोलीसांनी दिली.
३१ मे रोजी कोविशिल्डच्या दुसरा डोज देण्याची प्रक्रिया सुरु असताना प्रेम दुबे व सागर दुबे यांनी नोंदणी करणारे हेमंत तायडे यांच्याशी वाद घातला. नोंदणी करतांना संबंधितास रांगेतील मागच्या व पुढच्या व्यक्तीविषयी का विचारता? असा सवाल उपस्थित करून अर्वाच्च शिविगाळ केली. उपस्थित नागरिकांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला तरीही शिवीगाळ सुरूच होती. काही वेळाने लसीकरण केंद्रात दाखल झालेल्या दिनेश दुबे याने हेमंत तायडे यांना जोरदार मारहाण केली. हा प्रकार उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांना कळताच त्यांनी पोलीस निरीक्षकांशी संपर्क साधून या प्रकरणी तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले. डॉ. विजय पांडुरंग वाडेकर यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीसांनी प्रेम दुबे, सागर दुबे, दिनेश दुबे या तिघांविरुद्ध भादंविच्या ३५३, ३३२, २९४, ५०४, ५०६,३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. प्रेम व सागर दुबे यांना तात्काळ अटक करण्यात आली होती. तर शहर कॉंग्रेस कमिटीचा अध्यक्ष असलेला दिनेश दुबे फारार झाला होता. पुन्हा फरार होण्याच्या तयारीत असताना उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष राऊत व ठाणेदार सचिन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे व सहकाऱ्यांनी मलकापूर येथून अटक केली.