शहर सौंदर्यीकरण, रस्ता रुंदीकरणासाठी ‘अँक्शन प्लॉन’
By admin | Published: July 7, 2014 12:34 AM2014-07-07T00:34:06+5:302014-07-07T00:56:12+5:30
अतिक्रमण निर्मूलनानंतर आता शहर सौंदर्यीकरण आणि रस्ता रुंदीकरणासाठी महापालिका प्रशासनाने आराखडा तयार केला आहे.
अकोला- अतिक्रमण निर्मूलनानंतर आता शहर सौंदर्यीकरण आणि रस्ता रुंदीकरणासाठी महापालिका प्रशासनाने आराखडा तयार केला आहे. या आराखड्याची अंमलबजावणी झाल्यास शहरातील वाहतुकीची समस्या मिटणार आहे. शहरातील टॉवर चौक व इतर भागातील अतिक्रमण हटविण्याची कारवाई मनपाच्यावतीने करण्यात आली आहे. शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत अतिक्रमण हटविण्याची कारवाई पूर्ण झाल्यानंतर शहरातील रस्ते विकासासह सौंदर्यीकरणाचे कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी भविष्यातील विचार करून, शहरातील विकासकामाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार अतिक्रमण हटविण्यात आलेल्या टॉवर चौक ते फतेह चौक या रस्त्याचा विकास आणि सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी या भागाचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामध्ये या रस्त्यावरून दररोज ३ ते ४ हजार विद्यार्थी ये-जा करतात. तसेच या भागातील व्यावसायिकांचा विचार करून, शास्त्री स्टेडियमच्या बाजूला रस्त्यावर पेवर्स, ऑटोलेन, सायकलिंग व वॉकिंग ट्रॅक तसेच फुटपाथचे काम करण्यात येणार आहे. याशिवाय सार्वजनिक स्वच्छतागृह व पोलिस चौकी कार्यान्वित करण्यात येणार आहे. टॉवर चौक ते फतेह चौक या रस्ता विकासाचे काम दग्र्याच्या मागील बाजूने करण्यात येणार आहे. शहरातील रस्ते विकासासह इतर सौंदर्यीकरणाच्या कामांचा विकास आराखडा मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांच्या मार्गदर्शनात आर्किटेक्ट सोहेलखान सुभानखा यांनी तयार केला आहे.