अकोल्याच्या कंट्रोलरूमला बीडचा माेबाईल क्रमांक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 10:24 AM2021-02-25T10:24:03+5:302021-02-25T10:27:53+5:30
Akola News स्थानिक लाभार्थीना लसीकरणानंतर आरोग्यविषयक समस्या उद्भवल्यास त्याला बीडच्या डॉक्टरांशी संपर्क करावा लागत आहे.
- प्रवीण खेते
अकोला: कोरोनाची लस घेतल्यावर लाभार्थीना आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्यास ती निवारणासाठी जिल्हा स्तरावर कंट्रोल रुमची निर्मिती केली आहे; मात्र या कंट्रोल रुमला बीडच्या डॉक्टरांचा संपर्क क्रमांक देण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक लाभार्थीना लसीकरणानंतर आरोग्यविषयक समस्या उद्भवल्यास त्याला बीडच्या डॉक्टरांशी संपर्क करावा लागत आहे. हीच चूक राज्यातील इतर जिल्ह्यांतही झाल्याचे वास्तव ‘लोकमत’ने केलेल्या रिॲलिटी चेकच्या माध्यमातून उघडकीस आले.
राज्यात सर्वत्र कोविड लसीकरण मोहीम सुरू आहे. लस घेतल्यावर लाभार्थीना आरोग्यविषयक काही समस्या उद्भवल्यास ती निवारणासाठी प्रत्येक जिल्ह्यात कोरोना कंट्रोल रुमची निर्मिती केली आहे. त्यासाठी प्रत्येक लसीकरण केंद्रात कंट्रोल रुमचा ९४२२७४४८३३ हा संपर्क क्रमांक देण्यात आला आहे. हा क्रमांक सुरू आहे की, नाही याची पडताळणी करण्याच्या उद्देशाने यावर ‘लोकमत’ने संपर्क केला; मात्र हा क्रमांक अकोल्याचा नसून बीड येथील असल्याचे समोर आले. हा संपर्क क्रमांक केवळ बीड जिल्ह्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर सुरू केला होता; मात्र आरोग्य विभागाच्या एका चुकीमुळे अकोल्यासह राज्यातील इतरही जिल्ह्यांत कोरोना कंट्रोल रुमला हाच संपर्क क्रमांक कायम ठेवला आहे. संबंधित डॉक्टरांकडून राज्यातील लाभार्थीना मार्गदर्शन केले जात असले, तरी लस घेतल्यानंतर गंभीर स्वरूपाच्या रुग्णाला उपचाराची गरज भासल्यास ते देखील हतबल हाेत आहेत.
चूक लक्षात आणून दिल्यावरही ताेच क्रमांक कायम
कोविड कंट्रोल रुमसाठी दिलेला हा क्रमांक बीड येथील एका डॉक्टराने नमुने म्हणून राज्यातील इतर जिल्ह्यांना दिला होता; मात्र अनेकांनी संपर्क क्रमांकासह तोच मजकूर कायम ठेवत संबंधित जिल्हा आरोग्य विभागाचे नाव टाकले. अकोल्यातील कोविड लसीकरण केंद्रात दिलेल्या कोविड कंट्राेल रुमचा क्रमांक हा चुकीचा असून, स्थानिक कंट्रोल रुमचा संपर्क क्रमांक देणे अपेक्षित आहे, असे बीड येथील जिल्हा एकात्मिक केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कळविले होते. त्यानंतरही ही चूक अशीच कायम ठेवली. हीच स्थिती राज्यातील इतरही जिल्ह्यांची आहे.
अकोल्यासह या जिल्ह्यातून येतात कॉल
लस घेतल्यानंतर उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्या सोडविण्यासाठी दिलेल्या कंट्रोल रुमचा क्रमांक हा बीड येथील आहे. त्यामुळे लस घेणाऱ्या लाभार्थीचे कॉल थेट बीड येथील कंट्रोल रुमला लागतात. या ठिकाणी अकोल्यासह भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नाशिक, नगर, सोलापूर, ठाणे यासह राज्यातील इतरही जिल्ह्यांतून काॅल येत असल्याची माहिती कंट्रोल रुमकडून देण्यात आली.