शेगावात प्रकट दिन महोत्सवास सुरुवात
By admin | Published: February 12, 2017 12:33 AM2017-02-12T00:33:37+5:302017-02-12T00:33:37+5:30
श्रींच्या प्रकट दिनोत्सवाची सुरुवात ११ फेब्रुवारी रोजी महारुद्र स्वाहाकार यज्ञाने करण्यात आली.
शेगाव, दि. ११- श्री संत गजानन महाराज संस्थानमध्ये श्रींच्या १३९ व्या प्रकट दिनोत्सवाची सुरुवात ११ फेब्रुवारी रोजी सकाळी १0 वा. महारुद्र स्वाहाकार यज्ञाने विश्वस्त विश्वेश्वर त्रिकाळ यांच्या हस्ते करण्यात आली.
श्रींच्या प्रकट दिनोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले. यात काकडा, भजन, प्रवचन, हरिपाठ यासोबतच ११ रोजी सकाळी १0 वा. महारुद्र स्वाहाकार आरंभ विश्वस्त त्रिकाळ यांच्या हस्ते वैदशास्त्र संपन्न मथुरादास नारायणदेव चौथाईवाले राक्षस भुवन व १४ ब्राह्मणाद्वारे सुरुवात विधिवत पूजनाने करण्यात आली. ११ ते १८ पर्यंत वेदशास्त्र संपन्न ब्रह्मवृंदांच्या हस्ते मंत्रोच्चारात यज्ञ पूजन केले जाणार आहे.
१८ रोजी स.१0 वा. यागाची पूर्णाहुती व अवभृतस्नान व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील व विश्वस्त मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पूर्णाहुती व अवभृतस्नान होईल. तसेच दु.२ वा. श्रींच्या पालखीची रथ, मेणा व गज अश्वासह नगर परिक्रमा निघणार आहे. तसेच १९ रविवार रोजी जगन्नाथबुवा म्हस्के, मुंबई यांचे सकाळी ७ ते ८ काल्याचे कीर्तन होईल. ११ ते १८ फेब्रुवारीपर्यंत काकडा, भजन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन आदी कार्यक्रम सुरू झाले आहेत.
दर्शनाची भक्तांसाठी व्यवस्था
मंदिर परिसरात गर्दी होईल हे लक्षात घेऊन वनवे (एकेरी मार्ग) करण्यात आला आहे. त्यात दर्शनबारी व श्री मुख दर्शनबारी, महाप्रसाद श्रींचा पारायण मंडप, श्रींची गादी, पलंग व तसेच औदुंबर दर्शनाची व्यवस्था केली आहे.
निवास व्यवस्था
श्री मंदिर परिसर भक्त निवास १ व २, भक्तनिवास संकुल ३, ४, ५ व ६ तसेच आनंद विहार संकुल परिसर, आनंद विसावा याठिकाणी भक्तांसाठी निवास व्यवस्था अल्पदरात करण्यात आली आहे. १८ फेब्रुवारी रोजी हभप विष्णुबुवा कव्हळेकर यांचे सकाळी १0 ते १२ शेगावी श्रींच्या प्रागट्यानिमित्त कीर्तन होईल. उत्सव काळात भक्तांच्या सोयीसाठी सर्वतोपरी उपलब्ध आहे.