नळ जाेडणीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:53 AM2020-12-04T04:53:41+5:302020-12-04T04:53:41+5:30
खुलेनाट्यगृहाजवळ ऑटाेचालकांची मनमानी अकाेला: शहरातील खुलेनाट्यगृहाजवळ ऑटाेचालकांनी अनधिकृत थांबा निर्माण केला आहे. याठिकाणी ऑटाेचालकांच्या मनमानीमुळे वाहतूक विस्कळीत होत आहे. ...
खुलेनाट्यगृहाजवळ ऑटाेचालकांची मनमानी
अकाेला: शहरातील खुलेनाट्यगृहाजवळ ऑटाेचालकांनी अनधिकृत थांबा निर्माण केला आहे. याठिकाणी ऑटाेचालकांच्या मनमानीमुळे वाहतूक विस्कळीत होत आहे. थांबा नसताना मनमानीरीत्या भरचौकात ऑटाे उभे केले जात असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
डासांची पैदास वाढली
अकोला: शहरातील नाले-गटारांची नियमित साफसफाई होत नसल्याने डासांची पैदास वाढली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, डासांच्या उत्पत्तीला आळा घालण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने धुरळणी करण्याची मागणी होत आहे. याप्रकरणी नगरसेवकांनी चुप्पी साधल्याने नागरिकांमध्ये राेष आहे.
डाबकी राेड अंधारात
अकाेला: जुने शहरातील डाबकी राेड भागात बुधवारी रात्री पथदिवे बंद असल्याचा प्रकार समाेर आला. भिरड हाॅटेल ते कॅनाॅलपर्यंत रस्त्यावरील पथदिवे बंद झाल्यानंतर ते सुरू करण्यासाठी महापालिका प्रशासनाने काेणतेही प्रयत्न केले नाहीत. याप्रकरणी स्थानिक रहिवाशांनी प्रभागातील नगरसेवकांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली.
कारवाइचा अहवाल गुलदस्त्यात
अकाेला: महापालिका प्रशासनाने मनपा विद्यार्थ्यांसाठी ८४ लाख रुपयांतून सायकल खरेदीचे नियाेजन केले हाेते. याप्रकरणी महिला व बालकल्याण विभाग तसेच शिक्षण विभागाच्या ढिसाळ नियाेजनामुळे मुख्याध्यापकांनी सायकल खरेदीचा घाेळ केला. या प्रकरणाचा अहवाल अद्यापही गुलदस्त्यात आहे.
वीज देयक माफ करण्याची मागणी
अकाेला: टाळेबंदीच्या कालावधीत महावितरण कंपनीकडून वाटप करण्यात आलेले देयक माफ हाेण्याची अपेक्षा हाेती. तसे न करता वाढीव वीज देयकांचे वाटप करण्यात आले. यामुळे गरीब मालमत्ताधारकांवर संकट काेसळले असून, आर्थिक परिस्थिती लक्षात घेता महावितरण कंपनीने वीज देयक माफ करण्याच्या मागणीचे निवेदन अकाेट फैल भागातील नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
वातावरणात बदल; साथ राेगांचा फैलाव
अकाेला: मागील काही दिवसांमध्ये वातावरणात अचानक गारवा निर्माण झाला हाेता. त्यानंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले. आता पुन्हा एकदा थंडीचा जाेर वाढला आहे. वातावरणात सतत बदल हाेत असल्याचा परिणाम लहान मुुले व वयाेवृद्ध नागरिकांवर झाला आहे. शहरात साथ राेगांचा फैलाव झाल्याचे दिसत आहे.
गांधी चौकात अस्वच्छता
अकोला:शहराची प्रमुख बाजारपेठ अशी ओळख असलेल्या गांधी रोडवर साफसफाईअभावी कचरा साचल्याचे दिसून येते. गांधी चौकात मातीचे ढीग, साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. जैन मंदिर परिसरात मनपाने साफसफाइ करण्याची मागणी हाेत आहे.
‘ओपन स्पेस’वर अतिक्रमण
अकाेला: शहरात ले-आउटचे निर्माण करताना त्यामध्ये सार्वजनिक वापरासाठी ओपन स्पेस ठेवण्यात आले असले तरीही बहुतांश ओपन स्पेसमध्ये अतिक्रमण झाल्याचे आढळून येते. त्यामुळे वयोवृद्ध नागरिक, लहान मुलांची कुचंबणा हाेत असून, सदरचे अतिक्रमण तातडीने हटविण्याची गरज निर्माण झाली आहे.
रस्त्यावरील बॅरिकेड हटवा
अकोला:एकेरी वाहतूक व्यवस्था सुरू करण्याच्या सबबीखाली गांधी चौकात पोलिसांनी बॅरिकेड लावले. प्रशासनाचा मूळ उद्देश अपयशी झाला असून, या बॅरिकेडला लागूनच अतिक्रमकांनी व्यवसाय थाटला आहे, तसेच एकेरी वाहतुकीला पायदळी तुडवित चारचाकी वाहनधारक गांधी राेडवर वाहने उभी करीत आहेत.