तिसऱ्या लाटेची घंटा वाजली; जिल्ह्याची पूर्ण तयारी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:13 AM2021-07-19T04:13:43+5:302021-07-19T04:13:43+5:30
पहिली लाट एकूण रुग्ण - ११६२० बरे झालेले रुग्ण - १०५६४ मृत्यू - ३३५ दुसरी लाट एकूण रुग्ण -४६,१४१ ...
पहिली लाट
एकूण रुग्ण - ११६२०
बरे झालेले रुग्ण - १०५६४
मृत्यू - ३३५
दुसरी लाट
एकूण रुग्ण -४६,१४१
बरे झाले - ४५,९७५
मृत्यू - ७९८
८ टक्केच लोकांचे पूर्ण लसीकरण
१८ वर्षे वयोगटावरील एकूण लोकसंख्या १४,७९,४४२
एकूण लसीकरण - ४,९५६७८
पहिला डोस - ३,७५,२६३
दोन्ही डोस - १,२०,४१५
९ सेंटर, १२०० पेक्षा जास्त खाटांचे नियोजन
संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा तत्पर दिसून येते. दुसऱ्या लाटेदरम्यान सर्वोपचार रुग्णालय वगळता जिल्हा स्त्री रुग्णालय, आयुर्वेदिक महाविद्यालयासह ग्रामीण रुग्णालय आणि जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक कोविड केअर सेंटर उभारण्यात आले होते. या व्यतिरिक्त डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात जम्बो कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले होते. या सर्वच ठिकाणी कुठल्याही क्षणी कोविड केअर सेंटर व जम्बो कोविड रुग्णालय नव्याने सुरू करता येते. या ठिकाणी आरोग्य विभागातर्फे १२०० पेक्षा जास्त खाटांचे नियोजन असल्याची माहिती आहे.
लहान मुलांसाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालय
कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या अनुषंगाने कोरोना बाधित लहान मुलांसाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात विशेष सुविधा केली जाणार आहे. मात्र, हे काम संथगतीने सुरू आहे. या शिवाय, दोन खासगी बालरुग्णालये देखील कोविड काळासाठी आरक्षित ठेवण्यात आली आहेत.
एक ऑक्सिजन प्लांट प्रगतीपथावर
कोरोना काळात ऑक्सिजनचा तुटवडा पाहता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारणीच्या हालचालींना दुसऱ्या लाटेत वेग आला होता. सध्या या प्लांटची निर्मिती प्रक्रिया सुरू असून लवकरच हा प्लांट रुग्णांसाठी सुरू होईल.
या शिवाय, ऑक्सिजनची साठवणूक करुन ठेवण्याच्या दृष्टिकोनातून सर्वोपचार रुग्णालयासह जिल्हा स्त्री रुग्णालय व मूर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात १० केएल क्षमतेची ऑक्सिजन टँक उभारण्यात आली आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेत याचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला होता.
याशिवाय, लहान मुलांना ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये या दृष्टिकोनातून सुपर स्पेशालिटी रुग्णालय परिसरातही १० केएल क्षमतेचा ऑक्सिजन टँक उभारण्यात येत आहे.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या दृष्टिकोनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने पूर्ण तयारी केली आहे. तसेच लहान मुलांना असलेला संभाव्य धोका लक्षात घेता सुपर स्पेशालिटी रुग्णालयातही विशेष सुविधा केली जात आहे.
- डॉ. श्यामकुमार शिरसाम, वैद्यकीय अधीक्षक, जीएमसी, अकोला