महिला व बालकल्याण विभागाला सायकल वाटपासाठी लाभार्थी मिळेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 11:49 PM2017-11-23T23:49:29+5:302017-11-24T00:01:07+5:30
गेल्या काही वर्षांत जिल्हा परिषदेच्या विविध विभागांकडून लाभाच्या योजना बारगळल्याने यावर्षी लाभार्थींना अर्ज करणेच बंद केले. हा प्रकार महिला व बालकल्याण विभागाच्या लेडिज सायकल वाटपासाठी अर्जच न आल्याने अधोरेखित झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : गेल्या काही वर्षांत जिल्हा परिषदेच्या विविध विभागांकडून लाभाच्या योजना बारगळल्याने यावर्षी लाभार्थींना अर्ज करणेच बंद केले. हा प्रकार महिला व बालकल्याण विभागाच्या लेडिज सायकल वाटपासाठी अर्जच न आल्याने अधोरेखित झाला आहे. त्यामुळे समितीने बुधवारी झालेल्या बैठकीत विविध योजनांसाठी अर्ज करण्याला पुन्हा मुदतवाढ देत आता १0 डिसेंबरपर्यंत अर्ज मागवले आहेत.
समितीची बैठक सभापती देवका पातोंड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सदस्या ज्योत्स्ना बहाळे, माया कावरे यांच्यासह महिला व बालकल्याण अधिकारी योगेश जवादे यांच्यासह सदस्य उपस्थित होते. बैठकीत सौंदर्य प्रसाधने, ज्युडो कराटे प्रशिक्षणासाठी असलेला १५ लाखांचा निधी अंगणवाडीमध्ये सतरंजी खरेदीसाठी वळता करण्यात आला. सेसफंडातील लाभार्थी वाटप योजनांसाठी १0 ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, पुरेशा संख्येएवढे अर्ज न आल्याने आणखी अर्जांची गरज आहे. त्यासाठी आता सर्वच योजनांसाठी १0 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याला मुदतवाढ देण्याचा निर्णयही घेण्यात आला. विशेष म्हणजे, लेडिज सायकलीसाठी २९0 अर्जांची गरज आहे. प्राप्तपैकी ७३ अर्जांना मंजुरी देण्यात आली.
‘बीएलओं’चे काम अंगणवाडी सेविकांना द्या!
बैठकीत सदस्या माया कावरे यांनी निवडणुकीतील ‘बीएलओं’चे काम गावातील अंगणवाडीसेविकांना द्यावे, त्या गावातील रहिवासी असतात. नवमतदारांची त्यांना ओळख असते. त्यामुळे ते काम त्यांनाच द्यावे, असा ठराव समितीमध्ये त्यांनी घेतला. महिला व बालकल्याण अधिकारी जवादे यांनी महिला व बालकल्याण आयुक्तालयाने अंगणवाडीसेविकांना ते काम देता येत नसल्याबद्दल शासनाला आधीच कळवले आहे, असे सांगितल्यानंतरही ठराव घेऊन तो शासनाकडे पाठवण्याची मागणी कावरे यांनी केली.