अतिवृष्टीच्या अनुदानापासून लाभार्थी वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:20 AM2021-05-21T04:20:23+5:302021-05-21T04:20:23+5:30
वसाली, पांगरताटी, झरंडी, सावरगाव या चार गावांचा प्रभार तलाठी तौफिक अहमद यांच्याकडे असून, सावरगाव मुख्यालय आहे. परंतु तलाठी ...
वसाली, पांगरताटी, झरंडी, सावरगाव या चार गावांचा प्रभार तलाठी तौफिक अहमद यांच्याकडे असून, सावरगाव मुख्यालय आहे. परंतु तलाठी कार्यालय उघडत नाही. २०२०च्या सप्टेंबर महिन्यामध्ये सावरगाव परिसरात अतिवृष्टी झाली होती. त्यामध्ये जवळपास ७ ते ८० ग्रामस्थांची घरपडी झाली होती. काही लाभार्थ्यांना लाभ मिळाला. परंतु काही लाभार्थ्यांचे खाते क्रमांक तलाठ्यांनी चुकीचे दिल्यामुळे आतापर्यंत अनेक शेतकरी लाभापासून वंचित आहेत. तसेच फेरफार नोंदी, वारसाच्या नोंदी, विहिरी व बोरवेल नोंदी, आदी नोंदी प्रलंबित आहेत. तलाठी गावात येत नसल्याने शेतकऱ्यांना बँकेकडून कर्जासाठी लागणारे कागदपत्र मिळत नसल्याने शेतकरी बॅंकेच्या कर्जापासून वंचित आहेत. शेतकरी विविध कामासाठी सावरगाव येथे तलाठी कार्यालयावर सकाळपासून सायंकाळपर्यंत ताटकळत तलाठ्याच्या प्रतीक्षेत बसतात. याबाबत ग्रामस्थांनी पातूरचे तहसीलदार यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या. परंतु अद्याप दखल घेतली जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे.
तलाठ्यांच्या मुजोरीमुळे शेतकरी त्रस्त
पावसाळ्यापूर्वी शेतकरी पेरणीसाठी खत, बियाणे, खरेदी करण्यासाठी बँकेतून कर्ज काढतात. त्यासाठी तलाठ्याकडून कागदपत्रे लागतात. परंतु तलाठी गावात येत नसल्याने शेतकरी कागदपत्रांपासून वंचित आहेत. पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला तरी तलाठ्याकडून कागदपत्रे शेतकऱ्यांना मिळत नसल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे.