कोरोना लसीच्या दुसऱ्या डोजची लाभार्थ्यांमध्ये आतुरतेने प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 10:32 AM2021-02-13T10:32:26+5:302021-02-13T10:33:54+5:30
CoronaVaccine दुसरा डोज केव्हा मिळेल या बाबतदेखील अनेकांना उत्सुकता असल्याचे डॉ. गिऱ्हे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
अकोला : कोविड लसीकरणाला सुरुवात होऊन २८ दिवसांचा कालावधी पूर्ण होत आहे. या काळात लस घेतलेल्या अनेक लाभार्थ्यांना काही लक्षणे आढळून आली. त्यामुळे त्यांच्यात भीतीचे वातावरण होते, मात्र त्याचा मोठा दुष्परिणाम दिसून आला नाही. त्यामुळे हे लाभार्थी आता दुसऱ्या डोजची आतुरतेने प्रतीक्षा करत असल्याची माहिती कोविड लसीचे पहिले लाभार्थी डॉ. आशिष गुऱ्हे यांनी शुक्रवारी लोकमतशी बाेलताना दिली. गत वर्षभरात जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातल्याने जवळपास सर्वांनाच कोविड लसीची प्रतीक्षा होती. त्याच उत्साहात जिल्ह्यात कोविड लसीकरणाला सुरुवातही झाली. जिल्ह्यात कोविड लसीचे पहिले लाभार्थी डॉ. आशिष गिऱ्हे ठरले. जिल्हा स्त्री रुग्णालय येथील लसीकरण केंद्रावर डॉ. गिऱ्हे यांच्यासोबत जवळपास १०० डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोविड लस मोठ्या उत्साहात घेतली, मात्र दुसऱ्याच दिवशी काही लाभार्थ्यांना थंडी वाजून ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखी आदी लक्षणे आढळून आली. त्यामुळे इतर लाभार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. डॉ. गिऱ्हे यांनाही लस घेतल्यावर काही लक्षणे जाणवली, परंतु त्या दिवशी त्यांनी १३ तासांपेक्षा जास्त तास काम केल्याने थकवा येणे साहजिक असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. गिऱ्हे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना कोविडची लस घेऊन २८ दिवसांचा कालावधी पूर्ण होत आहे. या कालावधीत लस घेतल्यानंतरही भीती वाटली, परंतु आता प्रत्येक लाभार्थ्यांना लसीविषयी विश्वास निर्माण झाला आहे. कोरोनावरील लस पूर्णत: सुरक्षित असल्याचा अनुभव त्यांनी स्वत: घेतल्यानंतर ते इतरांनाही लस घेण्यासाठी प्रेरित करीत आहेत. विशेष म्हणजे लसीचा दुसरा डोज केव्हा मिळेल या बाबतदेखील अनेकांना उत्सुकता असल्याचे डॉ. गिऱ्हे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
लसीकरणानंतरची लक्षणे सकारात्मक
लस घेतल्यानंतर अनेकांना डोकेदुखी, थंडी वाजून ताप येणे, अंगदुखी यासारखी लक्षणे आढळून आल्याने लाभार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. ही लक्षणे सकारात्मक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कुठलीही लस घेतल्यानंतर शरीर त्यावर प्रतिक्रिया देते, तशीच प्रतिक्रिया कोविड लस घेतल्यानंतर शरीर देत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मत आहे. लस घेतल्यानंतर शरीर त्यावर प्रतिकार करते, म्हणजेच शरीरातील प्रतिकार शक्ती ॲक्टिव्ह होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
लस घेतली त्या दिवशी रात्री उशिरा थकवा जाणवला, पण ही परिस्थिती दिवसभरात केलेल्या कामामुळे देखील निर्माण होऊ शकते. त्यानंतर मात्र कुठलाच त्रास झाला नाही. मी स्वत: इतरांना लस घेण्यासाठी प्रेरित करतो. समोर या, लस घ्या, ही लस कोविड योद्ध्यांसाठीच तयार केली असून, माझे लसीकरण हे कोविडविरुद्धच्या लढ्यात जीव गमावलेल्या प्रत्येक कोविड योद्ध्याला समर्पित करतो. लस पूर्णत: सुरक्षित आहे.
डॉ. आशिष गिऱ्हे, हॉस्पिटल मॅनेजर, अकोला