घरकुलांच्या कामांसाठी अनुदानाची रक्कम लाभार्थींच्या खात्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 11:07 AM2020-09-29T11:07:24+5:302020-09-29T11:07:47+5:30
निधीअभावी रखडलेल्या घरकुल कामांचा मार्ग मोकळा झाला आहे.
- संतोष येलकर
अकोला : रमाई आवास योजनेंतर्गत २०१६-१७ व २०१७-१८ या दोन आर्थिक वर्षात मंजूर राज्यातील घरकुलांची कामे पूर्ण करण्यासाठी शासनाकडून १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, घरकुल कामांच्या अनुदानाची रक्कम लाभार्थींच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया अखेर २२ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे निधीअभावी रखडलेल्या घरकुल कामांचा मार्ग मोकळा झाला आहे.
शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर करण्यात आलेल्या लाभार्थींना घरकुल बांधकामांसाठी प्रत्येकी एक लाख २० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. २०१६-१७ व २०१७-१८ या दोन आर्थिक वर्षात राज्यात मंजूर करण्यात आलेल्या घरकुलांची कामे लाभार्थीकडून सुरू करण्यात आली; मात्र शासनाकडून निधी उपलब्ध झाला नसल्याने, गत फेब्रुवारीपासून घरकुल कामांच्या अनुदानाची रक्कम राज्यातील घरकुल लाभार्थींच्या बँक खात्यात जमा करण्यात आली नाही. त्यामुळे रमाई आवास योजनेंतर्गत राज्यातील सर्वच जिल्ह्यात गत सात महिन्यांपासून घरकुलांची कामे रखडली होती. त्यानुषंगाने घरकुल कामांच्या अनुदानाची रक्कम केव्हा उपलब्ध होणार, याबाबत लाभार्थीकडून प्रतीक्षा केली जात होती. या पार्श्वभूमीवर रमाई आवास योजनांतर्गत २९१६-१७ व २०१७-१८ या दोन वर्षातील राज्यातील घरकुलांची कामे पूर्ण करण्यासाठी शासनामार्फत १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, उपलब्ध निधीतून राज्यातील घरकुल लाभार्थींच्या बँक खात्यात घरकुल अनुदानाची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया २४ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली आहे.
घरकुलांची अपूर्ण
कामे होणार पूर्ण!
रमाई आवास योजनेत २०१६-१७ व २०१७-१८ या वर्षातील घरकुलांची कामे पूर्ण करण्यासाठी अनुदानाची रक्कम लाभार्थींच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने, निधीअभावी राज्यात अपूर्ण असलेल्या घरकुलांची कामे आता पूर्ण येणार आहेत.
रमाई आवास योजनेंतर्गत २०१६-१७ व २०१७-१८ या वर्षातील घरकुलांची कामे पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील घरकुल लाभार्थींच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
-सौरभ कटियार
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अकोला.