पात्र कुटुंबाला मिळणार शौचालय अनुदानाचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 02:51 PM2018-09-19T14:51:12+5:302018-09-19T14:51:36+5:30
वाशिम : बेसलाईन सर्वेक्षणात जिल्ह्यातील शेकडो कुटुंबांचा समावेश नसल्याने शौचालय अनुदानापासून सदर कुटुंब वंचित होते. आता पुन्हा सर्वे होत असल्याने जिल्ह्यातील सर्व पात्र कुटुंबाला अनुुदान मिळणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : बेसलाईन सर्वेक्षणात जिल्ह्यातील शेकडो कुटुंबांचा समावेश नसल्याने शौचालय अनुदानापासून सदर कुटुंब वंचित होते. आता पुन्हा सर्वे होत असल्याने जिल्ह्यातील सर्व पात्र कुटुंबाला अनुुदान मिळणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतच्या चमूद्वारे घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे.
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत ग्रामीण महाराष्ट्र हगणदरीमुक्त झाला असला तरी, अद्याप अनेक कुटुंबांकडे शौचालय नाही. शौचालयापासून वंचित असलेल्या या वाढीव कुटुंबांचा बेसलाईन सर्वे (पायाभूत पाहणी) केला जाणार आहे. वाशिम जिल्ह्यात सन २०१२ च्या बेसलाईन सर्वेनुसार जिल्ह्यातील शौचालयाचे बांधकाम केले. मात्र यानंतर कुटुंब संख्येमध्ये वाढ झाली. परिणामी या कुटुंबापैकी काही कुटुंबे शौचालयाविना राहिली. त्यामुळे सन २०१२ च्या बेसलाईन सर्वेतून सुटलेल्या व शौचालय नसलेल्या पात्र कुटुंबाची तसेच वाढीव कुटुंबाची माहिती सादर करण्याबाबतचे निर्देश शासनाने जिल्हा परिषदेला दिले आहेत. त्या अनुषंगाने गटविकास अधिकाºयांच्यावतीने १ ते ३० सप्टेंबर या दरम्यान कालबद्ध कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जात आहे. मयत, कायमस्वरूपी स्थलांतरीत व सद्यस्थितीत कोणत्याही कारणाने अस्तित्वात नसतील अशा कुटुंबांचा या यादीमध्ये समावेश केला जाणार नाही. सन २०१२ च्या सर्वेक्षणातून सुटलेल्या कुटुंबांना शौचालयाचा लाभ देताना संबंधित ग्रामसेवकांनी खात्री करावी, ग्रामसभेचे आयोजन करून ग्रामसभेत सुटलेल्या कुटुंबाच्या नावाच्या यादीचे वाचन करावे, तद्नंतर ग्रामसभेचा ठराव घेऊन ग्रामसभेची मान्यता घेण्यात येणार आहे. तत्पूर्वी प्रशासनाच्यावतीने घरोघरी जाऊन वाढीव कुटुंबांचा बेसलाईन सर्वे केला जात आहे.