वाढीव वीज बिलांचा शॉक; वंचितच्यावतीने विश्वासघात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 05:24 PM2020-11-18T17:24:29+5:302020-11-18T17:24:38+5:30
Akola News वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आघाडी सरकारने नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप करीत विश्वासघात आंदोलन करण्यात आले.
अकाेला : लॉकडाऊनकाळात वीज ग्राहकांना वाढीव बिलांचा शॉक बसला. आधीच अनेकांचे रोजगार गेले, त्यात वाढीव वीज बिले भरावीच लागणार, त्यामध्ये सवलत मिळणार नाही, असे ऊर्जामंत्र्यांनी स्पष्ट केल्याने,या धाेरणाच्या विरोधात बुधवारी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आघाडी सरकारने नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप करीत विश्वासघात आंदोलन करण्यात आले.
प्रदेश प्रवक्ता तथा युवा प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, प्रदेश प्रवक्ता डॉ. धैर्यवर्धन फुंडकर, प्रदेश महिला महासचिव अरुंधती सिरसाट, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महिला जिल्हाध्यक्ष प्रभा सिरसाट, प्रदीप वानखडे यांच्या नेतृत्वात अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर झालेल्या या आंदाेलनावेळी शासनाच्या विराेधात नारे देण्यात आले. ज्यांनी वीज वापरली आहे, त्यांना बिल भरावं लागेल, असं नितीन राऊत यांनी जाहीर केल्याने या सरकारने सामान्य जनतेशी विश्वासघात केल्याचा आराेप करण्यात आला.
लॉकडाऊनच्या कालावधीत वीज ग्राहकांकडील मीटर रिडिंग घेण्यात आले नाही. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात ग्राहकांना सरासरी वीज वापरानुसार वीज बिल देण्यात आले. मार्चनंतर प्रथमच थेट जूनमध्ये मीटर रिडिंग घेण्यात येत आहे. त्यामुळे मार्चपासून ते जूनमध्ये रिडिंग घेईपर्यंत एकूण वीज वापराचे एकत्रित व एकत्रित बिल ग्राहकांना देण्यात येत आहे. या बिलामध्ये ग्राहकांची प्रचंड लूट करण्यात येत आहे. ही लूट थांबविण्याची मागणी करण्यात आली. या आंदाेलनात वंचित बहुजन आघाडी जिल्हा शाखा, महिला आघाडी, सम्यक विधार्थी आंदोलन, युवा आघाडी आणि विद्ववत सभा यांनी सहभाग घेतला, यावेळी वीज बिलाची होळी करून राज्यपाल यांना जिल्हाधिकारीमार्फत निवेदन देण्यात आले.