‘कोरोना’पासून राहा सावध!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 02:27 PM2020-01-27T14:27:01+5:302020-01-27T14:27:11+5:30
आजाराची लक्षणे आढळताच डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने दिले आहे.
अकोला : चीनमध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पृष्ठभूमीवर राज्यात न्यूमोनिया, गंभीर स्वरूपाची श्वसन संस्थेची लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांबाबत दक्षता घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. आजाराची लक्षणे आढळताच डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने दिले आहे.
चीनमधील कहान शहरात न्यूमोनियाचे अनेक रुग्ण आढळले असून, त्याचे कारण नव्या प्रकारचा कोरोना विषाणू असल्याचे सिद्ध झाले आहे. याबाबत दक्षता म्हणून केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमानतळांवर प्रवाशांची तपासणी सुरू केली आहे. या पृष्ठभूमीववर आरोग्यसेवा विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सर्वच आरोग्य संस्थांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुषंगाने जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जनजागृती म्हणून जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांना कोरोनाच्या लक्षणांवर विशेष लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिवाय, नागरिकांनीही लक्षणे दिसताच आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इन्फ्लूएन्झासदृश रुग्ण आणि श्वसन संस्थेचा तीव्र प्रादुर्भाव या आजाराचे सर्वेक्षण सर्व आरोग्य संस्थांनी करणे आवश्यक आहे.
कोरोना विषाणू आजाराची लक्षणे
सर्दी, खोकला
गंभीर स्वरूपाची श्वसन संस्थेची लक्षणे
- न्यूमोनिया
- पचनसंस्थेची लक्षणे (उदा. अतिसार)
- काही रुग्णांमध्ये मूत्रपिंड निकामी होणे
नव्या जनुकीय रचनांचा ‘कोरोना’ विषाणू
सर्दी, खोकल्यापासून ते मर्स किंवा सार्ससारख्या गंभीर आजारास कारणीभूत असणाºया एका विशिष्ट प्रकारच्या विषाणू गटाला कोरोना विषाणू म्हटल्या जाते. २००३ मध्ये आढळलेला सार्स हाही एक प्रकारचा कोरोना विषाणूच होता. सध्या चीनमधील उद्रेकात आढळलेला विषाणू हा कोरोना विषाणूच आहे; पण त्याची जनुकीय रचना पूर्णत: नवीन असल्याने त्याला नॉव्हेल कोरोना विषाणू असे नाव देण्यात आले आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार नक्की कशाप्रकारे होतो, याची निश्चित माहिती उपलब्ध नाही; मात्र लक्षणांचे स्वरूप पाहता शिंकणे, खोकणे यावाटे हवेमार्फत या विषाणूचा प्रसार होत असावा, असा अंदाज आहे. या विषाणूसाठी सध्या कोणतीही लस किंवा औषध उपलब्ध नाही. हा प्राणीजन्य आजार असला, तरी कोणत्या प्राण्याच्या संपर्कापासून पसरतो, याबाबतही माहिती नाही.
कोरोना विषाणूचा धोका पाहता जिल्ह्यातही नागरिकांमध्ये जनजागृतीचा उपक्रम हाती घेण्यात येत आहे. यासंदर्भात सर्वच पीएचसीला सूचित करण्यात आले आहे.
- डॉ. एस. वाय. असोले, जिल्हा आरोग्य अधिकारी, अकोला.