जनता भाजी बाजारात व्यवसाय केल्यास खबरदार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:18 AM2021-04-18T04:18:40+5:302021-04-18T04:18:40+5:30
शहराच्या मध्यभागातील जनता भाजी बाजार व जुन्या बसस्थानकाच्या जागेवर वाणिज्य संकुलाचे व बाजाेरिया मैदानावर प्रेक्षागृहाचे आरक्षण आहे. मनपाचे तत्कालीन ...
शहराच्या मध्यभागातील जनता भाजी बाजार व जुन्या बसस्थानकाच्या जागेवर वाणिज्य संकुलाचे व बाजाेरिया मैदानावर प्रेक्षागृहाचे आरक्षण आहे. मनपाचे तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांनी क्रीडांगणाची जागा वगळता इतर दाेन जागांच्या हस्तांतरणाचे शुल्क २६ काेटी रुपये जिल्हा प्रशासनाकडे जमा केले आहे. जनता भाजी बाजारात मागील अनेक वर्षांपासून भाजीपाला, फळ विक्रीचा घाऊक व किरकाेळ व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी पर्यायी जागा देण्याची मागणी लावून धरली आहे. व्यावसायिकांच्या मागणीला मनपा प्रशासनाकडून केराची टाेपली दाखवली जात असल्याचे चित्र आहे. मध्यंतरी प्रशासनाने २६ मार्च राेजी जाहीर सूचनेद्वारा व्यावसायिकांना हरकती व सूचना सादर करण्याचे निर्देश दिले हाेते. एकूणच याप्रकरणी जिल्हा प्रशासन व मनपा प्रशासनाच्या स्तरावरील वेगवान हालचाली पाहता प्रशासनाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित हाेऊ लागले आहे.
याठिकाणी काेराेना हाेत नाही का?
मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी जनता भाजी बाजार व जुना भाजी बाजारातील व्यवसायावर निर्बंध आणत किरकाेळ भाजीपाला विक्रेत्यांसाठी भाटे क्लबची जागा व किरकाेळ फळ विक्रेत्यांसाठी बाजाेरिया मैदानाची जागा निश्चित करून दिली आहे. या दाेन्ही ठिकाणी नागरिकांना काेराेनाची लागण हाेणार नाही का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे़
जुन्या शहरात दाेन वर्षांपासून जलकुंभाची निर्मिती रखडली असून, प्रभागात जलवाहिनीचे अर्धवट जाळे टाकले आहे. ४५ काेटींच्या घनकचरा प्रकल्पाचा ‘डीपीआर’ सदाेष असून, प्रकल्पाचे काम रखडले आहे. या महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष न देता जिल्हा व मनपा प्रशासनाला जनता भाजी बाजारच्या जागेवर वाणिज्य संकुल उभारण्यात ‘इंटरेस्ट’ असल्याचे दिसून येते. मनपाने व्यावसायिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष केले असून, त्याचे परिणाम भाेगावे लागतील.
-साजीद खान पठाण, विराेधी पक्षनेता, मनपा
जनता भाजी बाजारप्रकरणी जिल्हा प्रशासन व मनपाची भूमिका संशयास्पद ठरत आहे. शहरहिताच्या अनेक याेजना अर्धवट असताना वाणिज्य संकुलाच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. सदर प्रकरण शासन दरबारी मांडण्यात येईल.
-नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख तथा आमदार शिवसेना