‘सीम व्हेरिफिकेशन पेेंडिंग’ असा मॅसेज आल्यास सावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:14 AM2021-06-03T04:14:38+5:302021-06-03T04:14:38+5:30

ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकरणात वाढ : सावधता बाळगणे आवश्यक अकोला : तुमचे सीमकार्ड बंद होणार आहे. डेटा अपडेट करण्यासाठी हा ...

Beware if you get a message like 'Seam Verification Pending' | ‘सीम व्हेरिफिकेशन पेेंडिंग’ असा मॅसेज आल्यास सावधान

‘सीम व्हेरिफिकेशन पेेंडिंग’ असा मॅसेज आल्यास सावधान

googlenewsNext

ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकरणात वाढ : सावधता बाळगणे आवश्यक

अकोला : तुमचे सीमकार्ड बंद होणार आहे. डेटा अपडेट करण्यासाठी हा कॉल आहे. त्यासाठी तुमचा फोन काहीवेळ बंद ठेवा, असे सांगणारा कॉल जर तुमच्या मोबाईलवर आला तर सावधान, ही तुमची फसवणूक असू शकते. इतकेच नव्हे, तर सीमकार्ड व्हेरिफिकेशनसाठी कॉल असल्याचे सांगूनही फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत.

गतवर्षी म्हणजेच २०२० मध्ये ऑनलाईन फसवणुकीच्या ४२, तर २०२१ मध्ये मे महिन्यापर्यंत तब्बल ११ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळीच सावध राहण्याचे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात येत आहे. सायबर भामटे विविध शक्कल लढवून नागरिकांची फसवणूक करीत आहेत. ओएलएक्सद्वारे वाहनविक्री, रिफंड तसेच लॉटरी लागल्याचे सांगून फसवणूक करीत आहेत. इतकेच नव्हे, तर बँकेतून बोलत असल्याचे सांगून एटीएमचा पिनकोड क्रमांक विचारून नागरिकांची फसगत या सायबर भामट्यांकडून केली जात आहे. आजपर्यंत तुमच्या ईमेलवर अनेकवेळा तुम्हाला लाखो रुपयांचे बक्षीस लागले आहे, आम्हाला खासगी माहिती मेल करा, अशा प्रकारे मेल येत हाेते. मात्र, आता या मेल्सबाबत अनेकजण जागरूक झाले आहेत. त्यामुळेच आता आर्थिक फसवणूक करण्यासाठी मोबाईलचा इंटरनेट डाटा अपडेट करायचाय, असं सांगत तुमची फसवणूक करण्याचे प्रकार जोरात सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांनी अशा फेक कॉलपासून सावध राहण्याचे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.

ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी सावधान

काेराेनामुळे जिल्हाभरात निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वजण घरीच आहेत. ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी विविध ॲप डाऊनलोड करताना अधिक सावध राहण्याची आवश्यकता आहे. कोणत्याही ॲपवर आपली खासगी माहिती विचारल्यास ती देऊ नये, चाैकशी करूनच ॲप डाऊनलोड करावे.

असा कॉल वा मेसेज आल्यास दक्षता पाळणे गरजेचे

सायबर भामटे फसव्या लिंक अथवा मेसेज पाठवून फसवणूक करीत असल्याचे आढळून आले आहे. त्याशिवाय एटीएम, केवायसी किंवा डेबिट, क्रेडिट कार्ड अपडेट तसेच सीमकार्ड व्हेरिफिकेशन करण्याच्या बहाण्याने नागरिकांकडून बँक खाते क्रमांक व त्यांच्या मोबाईलवर असलेला ओटीपी मिळवून कॅशबॅक देण्याचे आमीष दाखवून क्यूआरकोड स्कॅन करण्यास सांगितले जाते तसेच बँक खात्यातून परस्पर पैसे काढण्याचे प्रकार वाढत आहेत.

अशी घ्यावी काळजी

अनाेळखी फाेन आल्यास प्रतिसाद देऊ नये. एटीएमचा पासवर्ड कुणालाही सांगू नये. बँकेतून फोन आल्याचे सांगितल्यास ताे कट करावा, एटीएम बंद असल्याचे सांगितल्यास बँकेत जाऊन चाैकशी करावी. विमा काढायचा सल्ला दिल्यास थेट नकार द्यावा. लाखांची लॉटरी लागल्याचा फोन आल्यास विश्‍वास ठेवू नवे, मोबाईलवर येणारे फेक मेसेजेस, लिंक ओपन करू नका, आदी काळजी घेतल्यास फसवणूक होण्यापासून थांबेल.

काेट

ऑनलाईन फसवणुकीच्या घटना गत काही दिवसांपासून वाढल्या आहेत. नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. अनाेळखी फाेन काॅल, मॅसेज आल्यास प्रतिसाद देऊ नये. प्रलाेभने दाखविल्यास त्याला बळी पडू नये. फाेनवरून किंवा ऑनलाईन फसवणूक झाल्यास तक्रार करावी.

शैलेश सपकाळ

स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख

Web Title: Beware if you get a message like 'Seam Verification Pending'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.