खबरदार डुकरांना हात लावाल तर!

By admin | Published: July 13, 2017 01:27 AM2017-07-13T01:27:18+5:302017-07-13T01:27:18+5:30

सत्ताधारी भाजपावर वराह पालक, सफाई कर्मचाऱ्यांचा दबाव

Beware if you touch pigs! | खबरदार डुकरांना हात लावाल तर!

खबरदार डुकरांना हात लावाल तर!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: आमच्या मालकीच्या डुकरांना हात लावाल तर याद राखा, अशा शब्दांत वराह पालकांसह महापालिकेतील काही सफाई कर्मचाऱ्यांनी कंत्राटदाराला धाकदपट करण्यासोबतच सत्ताधारी भाजपावरसुद्धा दबावतंत्राचा वापर सुरू केला आहे. वराह पालकांच्या दबावासमोर झुकल्यामुळेच मनपाच्यावतीने सुरू झालेली डुकरे पकडण्याची मोहीम तीन दिवसांपासून ठप्प पडल्याचे चित्र समोर आले आहे.
शहरावर जीवघेण्या ‘स्वाइन फ्लू’चे संकट घोंगावत आहे. डुकरांच्या माध्यमातून या आजाराचा विषाणू पसरत असल्याची जाणीव असतानासुद्धा शहरात चक्क १६ ते १७ हजार डुकरांनी उच्छाद मांडला आहे. मोकाट डुकरांमुळे घाणीच्या समस्येत भर पडली असून, सर्वपक्षीय नगरसेवकांनी डुकरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याचा प्रस्ताव सभागृहात मंजूर केला आहे. स्थानिक वराह पालकांच्या दबावतंत्रामुळे डुकरांना पकडण्यासाठी कोणीही तयार होत नसल्याचे पाहून एका कंत्राटदाराच्या माध्यमातून मध्य प्रदेशातील २० जणांचे पथक अकोल्यात आणण्यात आले. डुकरे पकडण्याच्या पहिल्याच दिवशी स्थानिक वराह पालकांनी एकत्र येत कंत्राटदाराला धक्काबुक्की करीत जीवे मारण्याची धमकी दिली. ८ जुलैपासून बंद पडलेली ही मोहीम अद्यापही सुरू झाली नसल्यामुळे महापालिका प्रशासनासह सत्ताधारी भाजपाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

नगरसेवक गेले कुठे?
डुकरांच्या उच्छादामुळे प्रभागात घाण, अस्वच्छतेला हातभार लागत असून, मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात प्रशासन कुचकामी ठरल्याची ओरड सभागृहात सर्वपक्षीय नगरसेवक करतात. स्थानिक वराह पालक, मनपा सफाई कर्मचारी जेव्हा मनपाच्या मोहिमेला बंद पाडतात, त्यावेळी मात्र नगरसेवक पुढाकार न घेता चुप्पी साधत असल्याचे चित्र दिसत आहे.

पोलिसांचेही असहकार्य!
खदान, कैलास टेकडी, दुर्गा चौक आदी भागातील ५० ते ६० जणांनी डुकरे पकडणाऱ्या कंत्राटदाराला धक्काबुक्की करीत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मनपाच्यावतीने सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात ८ जुलै रोजी तक्रार देण्यात आली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी आरोपींना तातडीने अटक क रणे अपेक्षित होते.

पदाधिकाऱ्यांची मध्यस्थी
डुकरे पकडण्यासाठी प्रशासनाने सुरुवातीला स्थानिक वराह पालकांना सूचना केल्या. मनपातील सफाई कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या. त्यानंतरही प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून तीन वेळा निविदा प्रकाशित केली. वराह पालकांच्या दबावामुळे निविदा प्राप्त न झाल्यामुळे मध्य प्रदेशातील २० जणांच्या चमूला पाचारण करावे लागले. ८ जुलै रोजी शहरात डुकरे पकडण्याच्या मोहिमेला सुरुवात होताच सायंकाळी सफाई कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करीत प्रशासनाला ही मोहीम थांबवण्याची विनंती केली. दोन दिवसांत शहरातील डुकरांची विल्हेवाट लावण्याचे प्रशासनाला आश्वासन दिले.

Web Title: Beware if you touch pigs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.