सावधान, माती होतेय प्रदूषित !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:15 AM2021-06-04T04:15:40+5:302021-06-04T04:15:40+5:30
रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा बेसुमार वापर आणि पाण्याच्या अतिरिक्त वापराने जगभरातील अनेक सुपीक जमिनी अनुत्पादक बनल्या आहेत. त्यामुळे मातीच्या ...
रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा बेसुमार वापर आणि पाण्याच्या अतिरिक्त वापराने जगभरातील अनेक सुपीक जमिनी अनुत्पादक बनल्या आहेत. त्यामुळे मातीच्या जैविक गुणांचा ऱ्हास होत आहे, मातीच्या प्रदूषणात वाढ होत आहे. त्याचा परिणाम अन्न सुरक्षेवर झाल्याचे दिसून आले आहे. आता मृदेचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत आहे. मृदेच्या संवर्धनासाठी २०१५ ला सॉईल हेल्थ कार्ड ही योजना सुरू करण्यात आली आहे. त्या माध्यमातून मृदेचे स्वास्थ्य टिकवणे, शेतीच्या शाश्वत विकास करणे आणि त्याद्वारे अन्नसुरक्षा करणे हा उद्देश आहे. ही काळाची गरजही आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी माती परीक्षणाकडे वळले असल्याचे दिसून येते. कृषी विद्यापीठाच्या प्रयोग शाळेत झालेल्या परीक्षणामध्ये परिसरातील जमिनीत पालाशचे प्रमाण भरपूर प्रमाणात आहे. तर नत्र, स्फुरद, गंधक यांचे प्रमाण कमी आहे.
पाच वर्षांत विद्यापीठाकडे परीक्षणासाठी प्राप्त नमुने
वर्ष प्राप्त नमुने
२०१६-१७ १७३८
२०१७-१८ १२७४
२०१८-१९ ३४९३
२०१९-२० २१९६
२०२०-२१ ११३८
नत्रांचा अतिरेक हानिकारक
नत्रयुक्त खतांच्या अतिरेकी वापरामुळे पिण्याचे पाणी प्रदूषित होते. लहान मुलांमध्ये ‘ब्लू बेबी सिंड्रोम’ विकृती आढळून येते. पिकांमधील नत्र स्थिरीकरण प्रक्रिया मंदावते. कीटकनाशके, तणनाशकाचा असंतुलित वापरामुळे मातीमधील जैविक घटक तसेच इतर जीवसृष्टी धोक्यात आली आहे. शहरातील टाकाऊ पदार्थ, घनकचरा, कर्करोगास कारणीभूत जड धातू आदी घटकांमुळे विविध प्रकारच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे.
मातीचे प्रदूषण थांबविण्यासाठी हे आवश्यक
जमिनीचे भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्म बिघडले आहेत. त्यामुळे पिकांना अन्नद्रव्यांचा पुरवठा कमी होतो. परिणामी उत्पादकता कमी होते. मातीचे प्रदूषण थांबविण्यासाठी रासायनिक खते, कीटकनाशकांचा वापर कमी करावा लागेल. मातीचा दर्जा सुधारण्यासाठी जैविकरीत्या विघटित होणाऱ्या घटकांचा वापर करावा लागेल.
संवर्धित शेती काळाजी गरज
जमिनीची कमी मशागत करणे, जमिनीचे जास्तीत जास्त आच्छादन करणे व पिकांची फेरपालट हे तीन तत्त्व संवर्धित शेतीचे आहे. ही शेती काळाची गरज बनली असून याबाबत कृषी विद्यापीठाने शिफारशी दिल्या आहे.
शेतकऱ्यांनी जमिनीचे व्यवस्थापन करताना सर्वप्रथम माती परीक्षण करून घ्यावे, त्यानुसार खतांच्या मात्र कमी द्याव्या, त्यासोबतच शिफारशीत मात्रा कमी करावयाच्या असल्यास एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा पर्याय निवडावा. यामधून कंपोस्ट खत, शेणखत, हिरवळीची खते, जीवाणू खते, पिकांची फेरपालट या बाबींचा अवलंब करावा.
- डॉ. प्रकाश कडू, विभाग प्रमुख, मातीपरीक्षण विभाग, डॉ.पंदेकृवि