नैतिक मूल्य जपणारा समाजसेवक म्हणजेच भाई प्रदीप देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 03:20 PM2019-11-04T15:20:29+5:302019-11-04T15:21:00+5:30
एकसष्टीपूर्ती सोहळ्यात प्रदीप देशमुख यांना सपत्नीक मानद चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
अकोला : समाजात मूल्य रुजविण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. रुजविलेली मूल्ये जपणे गरजेचे आहे. हीच नैतिक मूल्ये गत अनेक वर्षांपासून जपण्याचे कार्य भाई प्रदीप देशमुख करीत आहेत. त्यांच्या या कार्याचा गौैरव शिक्षकांनी करावा, हीच त्यांच्या परोपकारी समाजसेवेची पावती असल्याचे प्रतिपादन विचारवंत तथा ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखडे यांनी केले.
आपल्या सामाजिक कार्यातून समाजापुढे वेगळा आदर्श निर्माण करणाऱ्या भाई प्रदीप देशमुख यांच्या ‘एकसष्टीपूर्ती’निमित्त रविवार, ३ नोव्हेंबर रोजी प्रमिलाताई ओक सभागृहात आयोजित गुणगौरव सोहळ्यात नागपूर येथील विचारवंत तथा ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखडे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विजय बिल्लेकर होते. याप्रसंगी देशमुख यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या एकसष्टीपूर्ती सोहळ्यात त्यांना सपत्नीक मानद चिन्ह देऊन गौरविण्यात आले. सोहळ्याला माजी मंत्री दशरथ भांडे, माजी आमदार दाळू गुरुजी, माजी शिक्षणाधिकारी पी. वानखडे, महादेवराव भुईभार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे व माजी आमदार बळीराम शिरस्कार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. शाहीर भगवंत गावंडे यांनी भाई प्रदीप देशमुख यांच्यावरील पोवाडा रचून त्यांच्या सामाजिक कार्याची ओळख करून दिली. यावेळी आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणजित सावरकर तसेच आमदार नितीन देशमुख यांनी विशेष उपस्थिती लावून भाई प्रदीप देशमुख यांच्या कार्याचा गौरव केला. शिक्षकांकडून करण्यात आलेल्या सत्काराला उत्तर देत भाई प्रदीप देशमुख म्हणाला की, आयुष्यात कधीही हारतुरे व सत्कार स्वीकारला नाही; परंतु गोपालखेड येथील शिक्षकांना माझी जन्मतारीख कळाल्याने त्यांनी या ‘एकसष्टीपूर्ती’ सोहळ्याच्या निमित्ताने माझ्या कार्याचा गौरव केला. प्रास्ताविक ज्ञानेश्वर मांडेकर यांनी केले.