ग्रामस्थांचा भक्तियोग, चोरट्यांचा कर्मयोग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2016 01:38 AM2016-08-13T01:38:37+5:302016-08-13T01:38:37+5:30
घुसर गावातील घटना: चार घरांमधील लाखोंचा ऐवज लंपास.
अकोला, दि. १२ : घुसर गावातील ग्रामस्थ गुरुवारी रात्रीच्या वेळी भक्तियोगात दंग झाले. ही संधी साधत चोरट्यांनीही त्यांचा कर्मयोग उरकून घेत, घरातील रोकड, सोन्या- चांदीच्या दागिन्यांवर हात साफ केले. पारायणात झालेल्या ग्रामस्थांना भक्तियोग चांगलाच महागात पडला. याप्रकरणी आकोटफैल पोलिसांनी शुक्रवारी दुपारी गुन्हा दाखल केला.
घुसर येथील वसंत प्रल्हाद पागृत (४५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गावामध्ये मंदिरात पारायण सुरू असल्याने ते पारायणाला गेले होते. दरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेले ३६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख ९ हजार २00 रुपये लंपास केले. दुसरी चोरीची घटना गावातीलच विठ्ठल बळीराम राजे (४0) यांच्या घरी घडली. राजेही रात्रीच्या वेळी घरात नव्हते. चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून कपाटातून रोख ९ हजार रुपये लंपास केले. चोरटे एवढय़ावरच थांबले नाही तर गावकरी पारायणात दंग असल्याची संधी साधत त्यांनी गावातील आणखी दोन घरे फोडली; परंतु या दोन घरांमध्ये त्याच्या हाती काहीच सापडले नाही. पारायणातून गावकरी आल्यानंतर त्यांनी चोरट्यांनी हात साफ केल्याचे कळले. घरातील अस्ताव्यस्त पडलेले साहित्य, फोडलेले कपाट पाहून गावकर्यांनी आकोट फैल पोलिसांना पाचारण केले. वसंत पागृत यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि कलम ३८0 नुसार गुन्हा दाखल केला.