Bharat Bandh: अकाेला शहरात अल्प तर ग्रामीण भागात संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 08:22 PM2020-12-08T20:22:56+5:302020-12-08T20:25:08+5:30
Bharat Banndh News काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी यांच्यासह भाकप व आयटक व विविध संघटनांनी पाठिंबा दिला हाेता.
अकाेला: केंद्राच्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात मंगळवारी पुकारण्यात आलेल्या भारत बंदला अकाेला शहरात अल्प तर जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. या बंदला काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी यांच्यासह भाकप व आयटक व विविध संघटनांनी पाठिंबा दिला हाेता. बंददरम्यान शिवसेना, काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेसने बाजारपेठेत बाइक रॅली काढत व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहभागी हाेण्याचे आवाहन केले. बंदच्या दरम्यान सहभागी संघटनांनी सरकारच्या विराेधात निदर्शने केली.
काॅंग्रेस-राकाने बाइक रॅली काढली. यात काॅंग्रेसचे प्रकाश तायडे, नितीन ताकवाले, पराग कांबळे, साजिद खान पठाण, कपिल रावदेव, मनीष हिवराळे, राजेश पाटील, विजय शर्मा, राजेश राऊत, प्रदीप वखारिया, तश्वर पटेल, रमाकांत खेतान आणि राकाडून जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, आमदार अमाेल मिटकरी, श्रीकांत पिसे, संताेष मुळे, शैलेष बाेदडे आदींसह शेकडाे कार्यकर्ते सहभागी झाले हाेते. काैलखेड, मलकापूर, सिव्हील लाइन्स, टाॅवर चाैक, फतेह चाैक, मदनलाल धिंग्रा चाैक, खदान या मार्गाने फिरले. यावेळी नगरसेवक मंगेश काळे, केदार खरे, प्रमाेद धर्माळे, सागर चाैधरी, कपिल दानी, नीलेश काळंके, अविनाश माेरे, याेगेश गीते आदी उपस्थित हाेते. बंदमध्ये शिवसैनिक जिल्हा प्रमुख आमदार नितीन देशमुख व निवासी उपजिल्हा प्रमुख व जि.प. गट नेते गाेपाल दातकर यांच्या नेतृत्वात सहभागी झाले.
बाजार समिती बंद
बंदच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाला विक्रीस आणला नाही. त्यामुळे बाजार समिती बंद हाेती. भाजी मंडई मात्र सुरू हाेती.
कायद्याच्या प्रतींची हाेळी
मदनलाल धिंग्रा चाैकात कृषी कायद्याची प्रतीकात्मक हाेळी करण्यात आली. या ठिकाणी केंद्र सरकारच्या निषेध करीत बंदमध्ये सहभागी हाेण्याचे आवाहन करण्यात आले. आंदाेलक व दुचाकींमुळे काही वेळ वाहतुकीची काेंडी झाली हाेती.