पश्चिम वऱ्हाडात भारत बंदला गालबोट; पातूरमध्ये सौम्य लाठीचार्ज : रिसोड, कारंजात दुकानांवर दगडफेक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 09:39 PM2020-01-29T21:39:20+5:302020-01-29T21:39:25+5:30
सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) विरोधात बहुजन क्रांती मोर्चा व इतर संघटनांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला पश्चिम वºहाडात गालबोट लागले.
अकोला: सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) विरोधात बहुजन क्रांती मोर्चा व इतर संघटनांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला पश्चिम वºहाडात गालबोट लागले.
अकोल्यातील पातुरात आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत रेस्टॉरंट, बस व खासगी वाहनांचे नुकसान झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीचार्ज केला व दहा आंदोलकांना ताब्यात घेतले. वाशिमधील कारंजा व रिसोड शहरात दुकानांवर दगडफेक तसेच काही वाहनांची तोडफोड करण्यात आल्याने या दोन्ही शहरांत तणावपूर्ण शांतता आहे. बुलडाणा जिल्ह्यात संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा आणि शेगाव येथे किरकोळ कारणावरून वाद झाला. यात शेगाव येथील एका दुकानावर दगडफेक झाली तर सोनाळा बसस्थानक परिसरात झालेल्या वादात एक जण जखमी झाला आहे. हे दोन अपवाद वगळता बुलडाणा जिल्ह्यात हा बंद शांततेत पार पडला.
सुधारित नागरिकत्व कायदा हा संविधानविरोधी असल्याने सदर कायदा रद्द करण्यात यावा, या मुख्य मागणीसाठी बहुजन क्रांती मोर्चा व मुस्लीम संघटनांनी २९ जानेवारी रोजी बंदची हाक दिली होती. अकोला जिल्ह्यातील पातूर येथे हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. पातूर येथील पोलीस ठाण्यासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजंूना वाहतुकीची कोंडी झाली होती. या दरम्यान, काही आंदोलकांनी अचानक दगडफेक केली. आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत बसच्या काचा फुटल्या, तर बिकानेर रेस्टॉरंटचेही नुकसान झाले. यावेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी आक्रमक जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. अकोला येथूनही पोलिसांची अतिरिक्त कुमक बोलाविण्यात आली असून, परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलिसांनी अमोल इंगळे, यासीन खान यांच्यासह दहा जणांना ताब्यात घेतले आहे.
वाशिम शहरात मात्र बंदला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. दरम्यान, कारंजा व रिसोड शहरात या बंदला गालबोट लागले. कारंजा शहरात रॅली दरम्यान आंदोलकांनी काही दुकानांवर दगडफेक केली. त्यामुळे या बंदला हिंसक वळण लागल्यामुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. दुकानासमोर उभ्या असलेल्या काही वाहनांवर दगडफेक केल्याने वाहनांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने बंदोबस्त वाढवून परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या कारंजा शहरात तणावपूर्ण शांतता असून, पोलीस यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. रिसोड शहरातही पुकारलेल्या बंदला दुपारच्या सुमारास गालबोट लागले. आंदोलकांनी तीन, चार दुकानांवर दगडफेक केली तसेच एका खासगी वाहनाच्या काचा फोडल्या.
बुलडाण्यातील सोनाळा आणि शेगाव येथे हॉटेल आणि व्यापारी प्रतिष्ठाने बंद करण्यासाठी आंदोलकांनी आग्रह धरल्यामुळे व्यापारी व मोर्चेकरी आमने-सामने आले होते; मात्र पोलिसांनी वेळीच ही परिस्थिती हाताळल्याने पुढील अनर्थ टळला. सोनाळा येथे हॉटेल बंद करण्याचा आंदोलकांनी प्रयत्न केला. त्यावरून किरकोळ तणाव निर्माण झाला होता; मात्र नंतर परिस्थिती नियंत्रणात आली. शेगावातील अग्रसेन चौकात व्यापारी आणि मोर्चेकरी आमने-सामने आले होते. त्यावेळी मोर्चेकऱ्यांनी तीव्र घोषणाबाजी केली; मात्र पोलिसांनी परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळत मोर्चा दुसºया बाजूने वळविला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या दरम्यान, एका दुकानावर किरकोळ दगडफेक झाल्याचीही माहिती असून, त्यात एका दुकानदाराच्या हाताला मार लागल्याची माहिती आहे.