Bharat Jodo Yatra: शेतकरी आंदाेलनात बलिदान दिलेल्या सीताबाईंचे पती व मुलीही पदयात्रेत
By राजेश शेगोकार | Published: November 15, 2022 12:42 PM2022-11-15T12:42:53+5:302022-11-15T12:43:18+5:30
Bharat Jodo Yatra: देशात झालेल्या शेतकरी कायद्याविराेधातील आंदाेलनात ज्यांनी बलिदान दिले, त्या शेतकरी नेत्या सीताबाई तडवी यांचे पती व दाेन्ही मुली या पदयात्रेत सहभागी हाेणार आहेत.
- राजेश शेगाेकार
अकाेला : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जाेडाे यात्रा आज १५ नाेव्हेंबर राेजी विदर्भात दाखल हाेत आहे. या यात्रेचा विदर्भातील प्रवास हा अनेक अंगांनी महत्त्वाचा ठरणार असून, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे दु:ख राहुल गांधी समजून घेणार आहेतच, शिवाय देशात झालेल्या शेतकरी कायद्याविराेधातील आंदाेलनात ज्यांनी बलिदान दिले, त्या शेतकरी नेत्या सीताबाई तडवी यांचे पती व दाेन्ही मुली या पदयात्रेत सहभागी हाेणार आहेत.
दिल्लीच्या वेशीवर झालेल्या शेतकरी आंदोलनात नंदुरबार जिल्ह्यातील आंबाबरी गावातील सीताबाई तडवी सहभागी झाल्या हाेत्या. १६ जानेवारी २०२१ पासून दिल्लीतील शहाजापूर सीमेवरील शेतकरी आंदोलनात त्यांनी भाग घेतला. त्या २६ जानेवारीला शेतकरी आंदोलनाच्या परेडमध्येही सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर नंदुरबारला परतत असताना कडाक्याच्या थंडीमुळे त्यांचा मृत्यू झाला.
सीताबाई तडवी यांनी शेतकरी कायद्यांविराेधातील आंदाेलनात आपले बलिदान दिले. त्यांची स्मृती व याेगदानासाेबतच शेतकऱ्यांचे प्रश्न या पदयात्रेच्या निमित्ताने समाेर यावे, याकरिता त्यांचे पती रामदास व दाेन्ही मुली या पदयात्रेत सहभागी हाेत आहेत.
काेण आहेत सीताबाई?
सीताबाई तडवी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरील विविध आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. त्यासाठी त्यांना तुरुंगातही जावं लागलं आहे. लोकसंघर्ष मोर्चाच्या त्या सहकारी होत्या. तसेच शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी त्यांनी मोर्चात भागही घेतला होता. लोकसंघर्ष मोर्चाचे उलगुलान आंदोलन, आदिवासींच्या न्याय हक्कासाठी संघर्ष, अशा अनेक मोर्चांत त्या नेहमी अग्रेसर असत.
मेधा पाटकर, श्याम मानव यांचा सहभाग
नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव, ज्येष्ठ पत्रकार खासदार कुमार केतकर यांच्यासह
अनेक स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी पदयात्रेत सहभागी हाेत आहेत. पातूर ते शेगावदरम्यान हे मान्यवर राहुल गांधी यांच्यासमवेत पदयात्रा करणार
आहेत.