थकीत मालमत्ता करप्रकरणी भारत विद्यालय कुलूपबंद
By Admin | Published: January 30, 2015 01:39 AM2015-01-30T01:39:18+5:302015-01-30T01:39:18+5:30
अकोला मनपाची कारवाई; संस्थाचालकांचा आक्षेप.
अकोला : आठ वर्षांचा मालमत्ता कर थकीत असल्याच्या सबबीखाली भारत विद्यालयाला सील लावण्याची कारवाई गुरुवारी महापालिका प्रशासनाने केली. धनादेश अनादर झाल्याने ही कारवाई केल्याचा दावा प्रशासनाने केला असला तरी सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने मनपाच्या कारवाईवर संस्थाचालकांनी आक्षेप नोंदवला.
तापडियानगरस्थित भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सेवारत आहे. संबंधित संस्थाचालकांकडे २00६-0७ पासून ६ लाख ५२ हजार रुपये मालमत्ता कर थकीत आहे. प्रशासनाने जारी केलेल्या सूचना व नोटीस लक्षात घेता, संस्थाचालकांनी तीन धनादेश मनपा प्रशासनाला सुपूर्द केले. यापैकी केवळ एक लाख रुपयांचा धनादेश वटला असून, उर्वरित रकमेचे दोन धनादेश अनादरित झाल्याची सबब पुढे करीत प्रशासनाने भारत विद्यालयातील कार्यालय, शिक्षकांच्या खोल्यांना सील लावण्याची कारवाई केली.