भरधाव कारने शेतमजूर महिलेस चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:34 AM2021-03-13T04:34:55+5:302021-03-13T04:34:55+5:30
बोरगाव मंजू/ कुरणखेड : राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काटेपूर्णा बसथांब्यानजीक भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने एका ...
बोरगाव मंजू/ कुरणखेड : राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काटेपूर्णा बसथांब्यानजीक भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने एका ३० वर्षीय शेतमजूर महिलेस चिरडल्याची घटना शुक्रवार, दि. १२ मार्च रोजी दुपारी २ वाजता दरम्यान घडली. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला. फुलमा वानखडे असे मृत महिलेचे नाव आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काटेपूर्णा खर्डा भीमनगर येथील रहिवासी फुलमा राहुल वानखडे (३०) व इतर चार महिला सकाळी शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या. शेतातील काम आटोपून घरी परत येत असताना कुरणखेड बसथांब्यानजीक मूर्तिजापूरकडून अकोल्याकडे जाणारी कार क्रमांक (एम.एच १२ जी.सी.६१५७)ने शेतमजूर महिला फुलामा वानखडे हिला जोरदार धडक दिली. या अपघातात घटनास्थळीच महिलेचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार सुनील सोळंके, एएसआय सतीश सपकाळ, नामदेव केंद्रेसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मूर्तिजापूर येथील रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. अपघात एवढा भीषण होता की, कार रोडच्या कडेला उलटली. बोरगाव मंजू पोलिसात सुशील मोहोड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार सुनील सोळंकेसह पोलीस करीत आहेत. (फोटो)