अकोला जिल्हा परिषदेच्या सभापती पदांवर भारिप-बमसंचे वर्चस्व!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 12:14 PM2020-01-31T12:14:27+5:302020-01-31T12:14:35+5:30
दोन विषय समिती सभापती पदावर चंद्रशेखर पांडे गुरुजी, पंजाबराव वडाळ, तर समाजकल्याण समितीवर आकाश सिरसाट, महिला व बालकल्याण सभापतीपदी मनीषा बोर्डे यांची निवड झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हा परिषदेच्या चारही सभापती पदांवर भारिप-बमसंचे उमेदवार विजयी झाले. भाजपने निवड प्रक्रियेत सहभाग न घेतल्याने भारिप-बमसं विरुद्ध महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये लढत झाली. त्यामध्ये २५ विरुद्ध २१ मतांनी चारही सभापती पदे भारिप-बमसंच्या ताब्यात आली. दोन विषय समिती सभापती पदावर चंद्रशेखर पांडे गुरुजी, पंजाबराव वडाळ, तर समाजकल्याण समितीवर आकाश सिरसाट, महिला व बालकल्याण सभापतीपदी मनीषा बोर्डे यांची निवड झाली.
महाविकास आघाडीचे उमेदवार भारिप-बमसंच्या उमेदवारांशी लढत देतील, हे निश्चित होते. त्यानुसार आघाडीतील काँग्रेसच्या उमेदवार म्हणून महिला व बालकल्याण सभापती पदासाठी अर्चना राऊत, शिवसेनेचे डॉ. प्रशांत अढाऊ यांचा समाजकल्याण सभापती पदासाठी, तर दोन विषय समिती सभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुमन गावंडे, अपक्ष गजानन पुंडकर यांचे अर्ज दाखल करण्यात आले. चारही पदांसाठी प्रतिस्पर्धी असल्याने अध्यासी अधिकारी डॉ. नीलेश अपार यांनी निवड प्रक्रिया पूर्ण केली. त्यामध्ये भारिप-बमसंचे चारही उमेदवार विजयी झाले.
दरम्यान, या निवड प्रक्रियेबाबत मतदान होईपर्यंत सर्वांच्या मनात धाकधूक होती. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर सत्तास्थापनेसाठी लागणारे बहुमत कोणत्याही पक्षाकडे नव्हते. गेल्या २० वर्षांच्या काळात सत्तेत असलेल्या भारिप-बमसंला सत्तेच्या जवळ नेणारे संख्याबळ म्हणजे २५ सदस्य मिळाले. तर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे २० सदस्य आहेत. त्यांना एक अपक्ष गजानन पुंडकर यांचा पाठिंबा आहे. तर भाजपकडे सात संख्याबळ आहे. या संख्याबळात जिल्हा परिषदेची सत्ता स्थापन करण्याची कसरत होती. भाजपने जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षाच्या निवड प्रक्रियेच्या वेळी सभागृहातून बहिर्गमन केले. त्यावेळी २५ विरुद्ध २१ मतांनी त्या दोन्ही पदांवर भारिप-बमसंचा विजय झाला. त्यानंतर चार सभापतींच्या निवड प्रक्रियेत बहुमताच्या आकड्याबाबत सर्वत्र साशंकता होती; मात्र भाजपच्या सात सदस्यांनी सभागृहात उपस्थितीच नोंदवली नाही. त्यामुळे सभागृहात उपस्थित असलेल्या ४६ सदस्यांमधून निवड प्रक्रिया पूर्ण झाली.
भारिप-बमसं विरुद्ध महाविकास आघाडी अशीच थेट लढत झाली. दोन्ही पक्षांची सदस्य संख्या निश्चित असल्याने सभागृहात उपस्थित बहुमताने निवडीवर शिक्कामोर्तब झाले. या निवड प्रक्रियेसाठी अध्यासी अधिकारी डॉ. अपार यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाड, प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांच्यासह तलाठी नितीन शिंदे, नाईक, जिल्हा परिषदेचे प्रशांत पिंजरकर, वरोकार उपस्थित होते.