करवाढीविरोधात भारिप रस्त्यावर!

By admin | Published: June 29, 2017 12:52 AM2017-06-29T00:52:26+5:302017-06-29T00:52:26+5:30

महापालिकेवर मोर्चा : आंबेडकरांनी केली आयुक्तांसोबत चर्चा

On the Bharip road against the tax hike | करवाढीविरोधात भारिप रस्त्यावर!

करवाढीविरोधात भारिप रस्त्यावर!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या करवाढीविरोधात रस्त्यावर उतरून भारिप बहुजन महासंघाच्यावतीने बुधवारी महापालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला. भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी मनपा आयुक्त अजय लहाने यांच्याशी चर्चा करून करवाढीला विरोध दर्शविला.
महानगरपालिकेने केलेली करवाढ चुकीची आणि बेकायदेशीर असल्याने करवाढीविरोधात भारिप-बमसंच्यावतीने मनपावर मोर्चा काढण्यात आला. ‘रद्द करा रद्द करा, करवाढ रद्द’, अशा घोषणा देत टॉवरस्थित भारिप-बमसं जिल्हा कार्यालयापासून काढण्यात आलेला मोर्चा शहरातील जुने बस स्टॅन्ड, काश्मीर लॉज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहासमोरून मार्गक्रमण करीत मनपासमोर पोहोचला. त्यानंतर भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह शिष्टमंडळाने करवाढीच्या मुद्यावर मनपा आयुक्त अजय लहाने यांच्याशी चर्चा केली व मागणीचे निवेदन सादर केले. यावेळी भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष आमदार बळीराम सिरस्कार, माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे, माजी आमदार हरिदास भदे, जिल्हा कार्याध्यक्ष काशीराम साबळे, भारिपच्या मनपा गटनेता अ‍ॅड. धनश्री देव, नगरसेवक बबलू जगताप, किरण बोराखडे, बालमुकुंद भिरड, अ‍ॅड. संतोष रहाटे, गजानन गवई, डॉ. प्रसन्नजित गवई, मनोहर पंजवाणी, डॉ. राजकुमार रंगारी, विजय पनपालिया, विजय तिवारी, श्याम अग्रवाल यांच्यासह मनपा उपायुक्त एस.सी. सोळंके व संबंधित अधिकारी उपस्थित होते. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या मोर्चात जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, उपाध्यक्ष जमीरउल्लाखा पठाण, डी.एन. खंडारे, भारिप-बमसं महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रतिभा अवचार, बुद्धरत्न इंगोले, मंतोष मोहोळ, वंदना वासनिक, सुरेखा गजघाटे, प्रतिभा नागदेवते, कोकिळा वाहुरवाघ, मनोरमा गवई, आसीफ खान, शीला आठवले, शांता वाहुरवाघ, शुभांगी सुरवाडे, शोभा पाटील, योगीता वानखडे, संगीता खंडारे, पराग गवई, प्रा. शैलेश सोनोने, सुनील जगताप, रवी पाटील, शोभा शेळके, विजय लव्हाळे, सम्राट सुरवाडे, प्रदीप वानखडे, विकास सदांशिव, प्रभाकर अवचार, शेख साबीर, दिनकर वाघ यांच्यासह भारिप-बमसंचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

करवाढ कमी केल्याशिवाय राहणार नाही; जुन्या दरानेच कर भरा - आंबेडकर
मनपातील सत्ताधाऱ्यांनी जनतेची आर्थिक लूट चालविली आहे. त्यांनी केलेल्या करवाढीला आमचा विरोध असून, शहरवासीयांनी जुन्या दरानुसारच कर भरावा, असे आवाहन करीत करवाढ कमी केल्याशिवाय राहणार नाही, करवाढीबाबत मनमानी चालू देणार नाही, असा इशारा भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मोर्चाला संबोधित करताना दिला. मनपाने केलेली करवाढ चुकीची असून, करवाढीचा घेतलेला ठराव बेकायदेशीर आहे. शहरातील गरीब घटकांना कर भरता येणार की नाही, याबाबतचा विचार करून कर लावला पाहिजे, यासंदर्भात मनपा आयुक्तांसोबत चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. भाडेपट्टा, व्यापारी संकुल आणि झोपडपट्टी भागासाठी करवाढ किती असावी, याबाबत नवीन ठराव मनपाच्या सभेत येणार असून, या ठरावाच्या बाजूने नगरसेवकांनी मतदान करावे, याबाबत नागरिकांनी आपल्या भागातील नगरसेवकांना सांगावे, असे आवाहनही अ‍ॅड. आंबेडकर यांनी यावेळी केले.

आंबेडकरांनी जुन्या दराने भरला कर!
करवाढीविरोधात मोर्चा मनपासमोर पोहोचल्यानंतर भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर शिष्टमंडळासह मनपा आयुक्तांसोबत चर्चा करण्यासाठी गेले. करवाढीच्या मुद्यावर चर्चा केल्यानंतर अ‍ॅड. आंबेडकर यांनी जुन्या दरानेच कर भरला. जुन्या कर आकारणीनुसार ४ हजार १५६ रुपये कराचा भरणा केल्याची पावती त्यांनी यावेळी घेतली.

१0 मिनिटांसाठी सभा तहकूब !
महानगरपालिकेची महासभा सुरु असताना अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात महापालिकेवर मोर्चा धडकला. या मोर्चाला सामोरे जाण्यासाठी महापालिकेची सभा १0 मिनिटे तहकूब केली होती.

मुंडण करून केला करवाढीचा निषेध!
महानगरपालिकेने केलेल्या करवाढीविरोधात भारिप बहुजन महासंघाच्यावतीने बुधवारी महापालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला. मोर्चा मनपासमोर पोहोचल्यानंतर भारिपच्या कार्यकर्त्यांनी मुंडण करून करवाढीचा निषेध केला. मोर्चा मनपा प्रवेशद्वारासमोर पोहोचल्यानंतर अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह शिष्टमंडळ करवाढीच्या मुद्यावर मनपा आयुक्तांसोबत चर्चा करण्यासाठी गेले असता, मोर्चात सहभागी भारिप-बमसंच्या नऊ कार्यकर्त्यांनी मनपासमोर मुंडण करून करवाढीचा निषेध केला. भारिप-बमसंचे प्रवीण पातोडे, जीवन डिगे, देवानंद खडे यांच्यासह शेख रफीक, विशाल पाखरे, प्रवीण इंगळे, शुद्धोधन सिरसाट, आकाश हेरोळे, धीरज जगताप, सुरज जगताप इत्यादी युवक कार्यकर्त्यांनी मुंडण करून करवाढीचा निषेध केला. मोर्चात सहभागी नऊ कार्यकर्त्यांनी करवाढीच्या निषेधार्थ मुंडण करून मोर्चात सहभागी पक्षाच्या इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.

Web Title: On the Bharip road against the tax hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.