भिका-यांनाही मिळेना भीक!
By admin | Published: November 13, 2016 02:18 AM2016-11-13T02:18:44+5:302016-11-13T02:18:44+5:30
सुट्या पैशांचा मोह सुटेना; नागरिकांचा आखडता हात.
अतुल जयस्वाल
अकोला, दि. १२- हजार-पाचशेच्या जुन्या नोटा चलनातून रद्द झाल्यानंतर अद्यापपर्यंत नवीन नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्या नाहीत. सुट्या पैशांचा तुटवडा निर्माण झाल्याच्या पृष्ठभूमीवर नागरिकांचा कल आता सुटे पैसे जपण्याकडे अधिक आहे. सुट्या पैशांचा मोह सुटत नसल्यामुळे मंदिरांसमोर बसलेल्या तसेच दारोदारी भीक मागणार्यांच्या झोळीत पैसे टाकताना नागरिक आखडता हात घेत असल्याचे वास्तव अकोला शहरात समोर आले आहे.
गरजूंना आपल्या कुवतीनुसार दान करण्याची भारतीय संस्कृती आहे. यामुळे पुण्य पदरी पडते, अशी श्रद्धा आहे. अनेक जण आपल्या इच्छेनुसार गरिबांना दान करतात. शहरात मंदिरांसमोर तसेच दारोदारी भीक मागून उदरनिर्वाह करणार्या निराधारांची संख्या मोठी आहे. बागातली देवी, शनि मंदिर, संतोषी माता मंदिर, राम मंदिर, गणेश मंदिर यासह शहरातील विविध मंदिरांसमोर अनेक निराधार व्यक्ती बसलेल्या असतात. मंदिरांमध्ये येणारे भाविक त्यांच्या झोळीत यथाशक्ती पैशाच्या स्वरुपात दान टाकतात. त्यावरच या निराधारांचा उदरनिर्वाह चालतो. केंद्र सरकारने हजार-पाचशेच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा अप्रत्यक्ष परिणाम या भिक्षेकर्यांवरही पडला आहे. या नोटा रद्द झाल्यानंतर नागरिकांपर्यंत अजूनही नवीन नोटा पोहोचलेल्या नाहीत. जवळच्या शंभर, पन्नास व दहा रुपयांच्या चलनी नोटा दैनंदिन वस्तू खरेदी करण्यात खर्ची पडल्यानंतर आता नागरिकांना या नोटांची चणचण भासत आहे. त्यामुळे जेवढे पैसे जवळ आहेत, ते जपण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. त्यामुळे नागरिक भिक्षेकर्यांना दान देताना आखडता हात घेत आहेत. पूर्वी पाच ते दहा रुपयांपर्यंत दान देणारे नागरिक आता या नोटा स्वत:कडे ठेवण्यातच धन्यता मानत आहेत. अशातच सुट्या पैशांचीही वानवा आहे. त्यामुळे भिक्षेकर्यांची मिळकत घटल्याचे ह्यलोकमतह्णने त्यांच्यासोबत केलेल्या चर्चेतून समोर आले आहे. पूर्वी दिवभरात ४0 ते ५0 रुपयांपर्यंत होणारी मिळकत आता १0 ते १५ रुपयांपर्यंत कमी झाल्याचे भिक्षेकर्यांनी सांगितले.
शुक्रवार गेला निरंक
संतोषी माता मंदिरात शुक्रवारी भाविकांची मोठी गर्दी असते. या शुक्रवारी मात्र भाविक फारसे मंदिराकडे फिरकले नाहीत. जे फिरकले त्यांनी काहीच दिले नसल्याची खंत कांताबाई झोंबाडे व अनुसयाबाई शेगोकार यांनी बोलून दाखविली.
-सकाळपासून एकाही भाविकाने पैसे दिले नाहीत. आज तुम्हीच पहिले भाविक आहात. दोन दिवसांपासून मिळकत कमी होत आहे.
- मोहन सदाना व शे. मोहम्मद.