मनपा सफाई कर्मचार्यांचे ‘भीक मांगो’ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 02:02 AM2017-08-03T02:02:49+5:302017-08-03T02:04:32+5:30
अकोला : चार महिन्यांच्या थकीत वेतनासह विविध मागण्यांसाठी महापालिकेच्या सफाई कामगारांनी बुधवारी शहरात ‘भीक मांगो’ आंदोलन राबवले. कर्मचार्यांनी महापालिका कार्यालयापासून ते मुख्य बाजारपेठेत फिरून अकोलेकरांजवळून ३ हजार १0७ रुपये जमा केले. ही रक्कम प्रशासनाला देण्याचा प्रयत्न केला असता प्रशासनाने रक्कम स्वीकारण्यास नकार दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : चार महिन्यांच्या थकीत वेतनासह विविध मागण्यांसाठी महापालिकेच्या सफाई कामगारांनी बुधवारी शहरात ‘भीक मांगो’ आंदोलन राबवले. कर्मचार्यांनी महापालिका कार्यालयापासून ते मुख्य बाजारपेठेत फिरून अकोलेकरांजवळून ३ हजार १0७ रुपये जमा केले. ही रक्कम प्रशासनाला देण्याचा प्रयत्न केला असता प्रशासनाने रक्कम स्वीकारण्यास नकार दिला.
मनपातील सेवारत तसेच सेवानवृत्त सफाई कर्मचार्यांचे मागील चार महिन्यांपासून वेतन आणि सेवानवृत्ती वेतन थकीत आहे. पाचव्या वेतन आयोगासह सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम देण्यास प्रशासन टाळाटाळ करीत असल्यामुळे सफाई कर्मचार्यांमध्ये रोष पसरला आहे.
गोगानवमीनिमित्त अग्रिम रक्कम, महागाई भत्ता देताना प्रशासनाने आखडता हात घेतल्याचा कर्मचार्यांचा आरोप आहे. कंत्राटी पद्धतीनुसार सफाई कर्मचार्यांची भरती रद्द करून आस्थापनेवर नवीन सफाई कर्मचार्यांची नियुक्ती करावी, साफसफाईसाठी विविध साहित्याचा अभाव असून, त्याचा पुरवठा करावा, शासनाच्या धोरणानुसार सफाई कर्मचार्यांच्या मंजूर पदावर १५ टक्के अतिरिक्त सफाई कामगारांची नियुक्ती करावी, रजा रोखीकरण, अंशराशीकरणाचा निपटारा करण्यासह विविध मागण्यांची पूर्तता होत नसल्यामुळे अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्यावतीने आंदोलन छेडले आहे. मनपा कार्यालयासमोर ६ जुलै रोजी धरणे आंदोलन छेडल्यानंतर बुधवारी (२ ऑगस्ट) शहरात भीक मांगो मोर्चा काढण्यात आला. दुपारी ३ वाजता मनपा कार्यालयासमोर जमलेल्या कर्मचार्यांनी गांधी चौक, जुना भाजी बाजार, गांधी रोड परिसरात फिरून अकोलेकरांजवळून पैसे जमा केले. ही रक्कम मनपा उपायुक्त सुरेश सोळसे यांच्याकडे सुपूर्द केली असता त्यांनी रक्कम स्वीकारण्यास नकार दिला. आंदोलनात पी.बी. भातकुले, अनुप खरारे, शांताराम निंधाने, विजय सारवान, हरिभाऊ खोडे, धनराज सत्याल, प्रताप सारवान, रमेश गोडाले, मदन धनजे, सोनू पचेरवाल, नारायण मकोरिया, शिवा बोयत, सचिन चावरे, मनोज निंधाने, ईश्वर थामेत, सतीश पटोने, सुरेश चौधरी, प्रताप झांझोटे आदींसह असंख्य महिला सफाई कर्मचारी सहभागी होत्या.
..अन्यथा ९ ऑगस्टपासून कामबंद
दोन आठवड्यांनंतर गोगानवमी सण आहे. त्यानुषंगाने प्रशासनाने अग्रिम रक्कम, महागाई भत्त्याची रक्कम तातडीने अदा न केल्यास ९ ऑगस्ट पासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.