अकोल्यात भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार, तिघांना अटक; अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 04:59 AM2018-04-03T04:59:09+5:302018-04-03T04:59:09+5:30
उपचार करण्याच्या नावाखाली २७ वर्षीय महिलेवर भोंदुबाबाने बलात्कार केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. याप्रकरणी पातूर पोलिसांनी भोंदुबाबासह तिघांना अटक केली. आरोपींनी पीडितेचे अश्लील फोटो काढून तिला ब्लॅकमेल केले.
पातूर (जि. अकोला) - उपचार करण्याच्या नावाखाली २७ वर्षीय महिलेवर भोंदुबाबाने बलात्कार केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. याप्रकरणी पातूर पोलिसांनी भोंदुबाबासह तिघांना अटक केली. आरोपींनी पीडितेचे अश्लील फोटो काढून तिला ब्लॅकमेल केले. पडित महिलेने पाच हजार रुपये दिल्यानंतरही भोंदू बाबाचा त्रास सुरू राहिल्याने सदर महिलेने पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरून पातूर पोलिसांनी औरंगाबादमध्ये जाऊन रात्री दोन वाजता भोंदुबाबासह तिघांना जेरबंद केले.
औरंगाबाद येथील एक २७ वर्षीय महिलेने प्रेम विवाह करून अकोल्यात संसार थाटला होता. पतीबरोबर वाद झाल्याने ही महिला दोन मुलांसह राहत होती. पोटात दुखत असल्यामुळे ती उपचार करण्यासाठी सैलानी (जि. बुलडाणा) येथील दर्ग्यात गेली.
तेथे आरोपी अखतखान रहमान खान (४१, रा. लोणार) रोशन खान (४५) कलदरखान शहानुर खान (३२, दोघेही रा. मलकापूर) या तिघांबरोबर तिची ओळख झाली. या तिघांनी तिला लिंबू व धागा दोरा देऊन उपचार केला आणि एक मोबाइलसुद्धा दिला व संपर्क करण्यास सांगितले. त्यानंतर आरोपींनी पीडित महिलेला शुक्रवारी लोणार येथे बोलावून उपचार केल्यानंतर गाडीत बसवून पातूर येथील शहाबाबू दर्ग्यामध्ये दर्शनासाठी आणले.
दर्शन झाल्यानंतर मुलांना गाडीत बसून ठेवून तिला मागच्या बाजूस जंगलात नेले व गाडीतच गुंगीचे औषध देऊन तिघांनी आळीपाळीने बलात्कार केला. तिचे अर्धनग्न फोटोसुद्धा काढले. तिच्या व्हॉटस्अॅपवर तिचे अर्धनग्न फोटो पाठवून ब्लॅकमेल करणे सुरू केले व दहा हजाराची मागणी केली.
तिने त्यापैकी पाच हजार रुपयेसुद्धा दिले; परंतु तरीही आरोपींनी उर्वरित पैसे देण्यासाठी पीडितेला त्रास देणे सुरू केले,
तसेच बदनामी करण्याची व जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पीडितेने पोलिसात धाव घेत तक्रार दिली.