भुसावळ-वर्धा पॅसेंजर गाडी एक्स्प्रेसमध्ये परिवर्तित होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 10:25 AM2020-10-21T10:25:01+5:302020-10-21T10:30:39+5:30
Indian Railway, Akola railway station रेल्वे बोर्डाने देशभरातील ३०४ पॅसेंजर गाड्यांना एक्स्प्रेसमध्ये परिवर्तित करण्यास हिरवी झेंडी दिली आहे.
अकोला : रेल्वेने दररोज २०० किलोमीटरपेक्षा अधिक पल्ला गाठणाºया देशभरातील तब्बल ३०४ पॅसेंजर गाड्यांना एक्स्प्रेसमध्ये परिवर्तित करण्यास २० ऑक्टोबर रोजी मान्यता दिली असून, यामध्ये अकोल्याहून जाणाºया भुसावळ-वर्धा व अकोला-पूर्णा या जोडी गाड्यांचा समावेश आहे. या गाड्या चालविण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना रेल्वे बोर्डाने झोनल मंडळांना दिल्या आहेत.
देशभरातील लोकप्रिय पॅसेंजर गाड्यांचा वेग वाढवून त्यांना एक्स्प्रेसमध्ये परिवर्तित करण्याबाबतचे प्रस्ताव व शिफारशी झोनल रेल्वे मंडळांनी रेल्वे बोर्डाकडे पाठविल्या होत्या. या शिफारशींवर विचार केल्यानंतर रेल्वे मंत्रालय व रेल्वे बोर्डाने देशभरातील ३०४ पॅसेंजर गाड्यांना एक्स्प्रेसमध्ये परिवर्तित करण्यास हिरवी झेंडी दिली आहे. यामध्ये मध्य रेल्वेच्या गाडी क्र. ५११९७ भुसावळ ते वर्धा, गाडी क्र. ५११९८ वर्धा ते भुसावळ आणि दक्षिण-मध्य रेल्वेच्या गाडी क्र. ५७५८३ अकोला ते पूर्णा, गाडी क्र. ५७५८३ पूर्णा ते अकोला या गाड्यांचा समावेश आहे. रेल्वे बोर्डाचे उपसंचालक विवेककुमार सिन्हा यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या आदेशात या गाड्यांना मान्यता देण्यात आली आहे. या गाड्यांसाठी नव्याने वेळापत्रक निश्चित करण्याच्या सूचनाही या आदेशात देण्यात आल्या आहेत.