लेकुरवाळी पुन्हा रुळावर, भुसावळ-वर्धा पॅसेंजर १६ सप्टेंबरपासून धावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 04:18 PM2022-08-29T16:18:05+5:302022-08-29T16:25:58+5:30
पहिल्या लॉकडाऊन काळात बंद झालेली पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेवेत रुजू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.
अतुल जैस्वाल
अकोला : सामान्य प्रवाशांची लेकुरवाळी अशी ओळख असलेली भुसावळ-वर्धा-भुसावळ ही पॅसेंजर गाडी १६ सप्टेंबर २०२२ पासून पुन्हा एकदा धावणार असून, अकोल्यासह इतर छोट्या स्थानकांवर या गाडीला थांबा राहणार असल्याने सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. पहिल्या लॉकडाऊन काळात बंद झालेली पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेवेत रुजू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.
मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळ कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, गाडी क्र. १११२१ भुसावळ-वर्धा पॅसेंजर ही १६ सप्टेंबर २०२२ पासून भुसावळ स्थानकावरून दररोजी दुपारी २.३० वाजता रवाना होऊन रात्री ९ वाजता वर्धा स्थानकावर पोहोचणार आहे. ही गाडी दररोज सायंकाळी ५.३० वाजता अकोला स्थानकावर येणार आहे. परतीच्या प्रवासात गाडी क्र. १११२२ वर्धा-भुसावळ पॅसेंजर ही गाडी १७ सप्टेंबर २०२२ पासून वर्धा स्थानकावरून दररोज रात्री १२.०५ वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी ७.२५ वाजता भुसावळ स्थानकावर पोहोचणार आहे. ही गाडी दररोज पहाटे ४.०० वाजता अकोला स्थानकावर येणार आहे. या गाडीला दहा जनरल व दोन एसएलआर असे एकूण १२ डबे असणार आहेत.
जिल्ह्यात या स्थानकांवर थांबा
अप व डाऊन दोन्ही बाजूच्या पॅसेंजर गाड्या अकोला व मूर्तिजापूर या मोठ्या रेल्वे स्थानकांसोबतच जिल्ह्यातील गायगाव, पारस, बोरगाव, काटेपूर्णा, मूर्तिजापूर, माना, कुरुम या लहान स्थानकांवरही थांबणार आहेत. अकोला स्थानकावर पाच मिनिटे, मूर्तिजापूर स्थानकावर दोन मिनिटे, तर इतर स्थानकांवर एक मिनीटचा थांबा असणार आहे.