विद्यार्थ्यांसाठी सायकल खरेदीची योजना रखडली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 10:42 AM2020-07-31T10:42:02+5:302020-07-31T10:42:11+5:30
१ हजार ९४८ विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्याच्या निर्णयाला खुद्द सत्ताधारी भाजपने सुरुंग लावला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : मनपा शाळेतील इयत्ता पाचवी, सहावी व सातवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या १ हजार ९४८ विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्याच्या निर्णयाला खुद्द सत्ताधारी भाजपने सुरुंग लावला आहे. सायकल खरेदीसाठी ८७ लाख ६६ हजार रुपयांच्या तरतुदीमुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाची समस्या अधिक बिकट होणार असल्याचे सांगत हा प्रस्ताव फेटाळून लावण्यात आल्याची आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरल्या गेले आहे.
महापालिकेतील महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मनीषा भन्साली यांनी विद्यार्थी व महिलांना विकासाच्या प्रवाहात आणण्याच्या उद्देशातून विविध योजना राबविण्यास प्रारंभ केला. मनपा शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच शहरातील गरजू कुटुंबातील महिलांना विविध साहित्याचे वाटप केले जाते. महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे म्हणून सभापती भन्साली यांनी मनपाच्या प्रत्येक शाळेमध्ये ‘आरओ’ प्लांट लावण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे सादर केला आहे.
यादरम्यान, मनपा शाळेत इयत्ता पाचवी, सहावी तसेच सातवीच्या वर्गामध्ये शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना सायकल उपलब्ध व्हावी, यासाठी तब्बल ८७ लक्ष ६६ हजार रुपयांचा प्रस्ताव प्रशासनाकडे सादर केला. या प्रस्तावाला प्रशासनाने मंजुरी दिली. तसेच हा प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी स्थायी समितीच्या समोर सादर केला. गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या भावना व गरज लक्षात घेता सत्ताधारी भाजपकडून सायकल खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची अपेक्षा होती. मात्र हा प्रस्ताव निधी अभावी रखडला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
सहा वर्षांपासून लाभार्थी वंचित
महापालिकेत भाजपाची २०१४ पासून सत्ता असली तरीही महिला व बालकल्याण समितीमार्फत शाळेतील विद्यार्थी व शहरातील गरजवंत महिलांना मदतीसाठी मागील सहा वर्षांपासून प्रतीक्षा करावी लागत असल्याचे दिसून येत आहे. सायकल खरेदीच्या निर्णयावर पाणी फेरल्यामुळे इयत्ता पाचवीतील ७५४ विद्यार्थी, इयत्ता सहावी - ६११ तसेच इयत्ता सातवीमधील ५८३ असे एकूण १,९४८ विद्यर्थ्यांचे स्वप्न धुळीस मिळाल्याचे समोर आले आहे.