सायकलने गेले, बैलगाडीने फिरले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 02:42 AM2017-08-02T02:42:13+5:302017-08-02T02:42:36+5:30

अकोला: महसूल दिनानिमित्त  ऑनलाइन सात-बारा वितरणासाठी चांदूर येथे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी शेतकर्‍याच्या वेशात सायकलवरून चांदूर गाठले. गावात बैलगाडीवरून फिरल्यावर ग्रामस्थांशी संवाद साधला. 

Bicycling, riding the carriage! | सायकलने गेले, बैलगाडीने फिरले!

सायकलने गेले, बैलगाडीने फिरले!

googlenewsNext
ठळक मुद्दे जिल्हाधिकार्‍यांनी चांदूर गावात केली ऑनलाइन सात-बारा संदर्भात जनजागृती! शेतकर्‍याच्या वेशात सायकलवरून गाठले चांदूर बैलगाडीवरून फिरल्यावर ग्रामस्थांशी संवाद साधला

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: महसूल दिनानिमित्त  ऑनलाइन सात-बारा वितरणासाठी चांदूर येथे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी शेतकर्‍याच्या वेशात सायकलवरून चांदूर गाठले. गावात बैलगाडीवरून फिरल्यावर ग्रामस्थांशी संवाद साधला. 
अकोला तालुक्यातील चांदूर येथे  महसूल  दिनानिमित्त आयोजित ऑनलाइन संगणकीकृत  सातबाराच्या जनजागृती कार्यक्रमासाठी यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपविभागीय  अधिकारी उदय राजपूत, उपविभागीय  अधिकारी संजय खडसे, जिल्हा परिषद सदस्य  मंजूषा लंगोटे, पंचायत समिती सदस्य  सुमन इंगळे, सुरेश सोळंके, चांदूरच्या सरपंच ऊर्मिला अढाऊ, उपसरपंच चंद्रकांत माहोरे, जिल्हा परिषद  सभापती लखुआप्पा  लंगोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सायकलवरून गावात पोहचलेल्या जिल्हाधिकारी यांचा                   गावकर्‍यांतर्फे मानाचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला.  त्यांना  सजवलेल्या  बैलगाडीतून  कार्यक्रमस्थळी नेण्यात आले. जिल्हाधिकार्‍यांनी सर्वप्रथम गावाच्या वेशीवर मागील वर्षी महसूल दिनानिमित्त  लागवड करण्यात आलेल्या वृक्षांची पाहणी केली व वृक्ष  संवर्धनासाठी गावकर्‍यांनी घेतलेल्या परिश्रमाचे त्यांनी कौतुक केले. यानंतर जिल्हा परिषदच्या  डिजिटल वर्गखोल्यांचे उद्घाटन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते  करण्यात आले. या शाळेच्या आठ  खोल्या लोकवर्गणीतून  डिजिटल  करण्यात आल्या आहेत. या उपक्रमाचे  जिल्हाधिकारी यांनी कौतुक केले.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, माणसाने मानवाला मानव म्हणून वागणूक दिली पाहिजे. महसूल कर्मचारी, अधिकार्‍यांनी आपणाकडे  येणार्‍या  नागरिकांच्या व्यथा  समजून त्यांची समस्या,  अडी-अडचणी सोडविल्या तर एक  प्रकारचा आनंद प्राप्त होतो, असे सांगून  जिल्हाधिकारी  पुढे म्हणाले की,  ग्रामीण भागातील जनसेवा गतिमान,  पारदर्शक   व तत्पर सेवा  देण्यासाठी महसूल  विभाग  कटिबद्ध  आहे. सात-बारा हा शेतकर्‍यांच्या शेती संबंधातील महत्त्वाचा दस्तावेज आहे. यासाठी शेतकर्‍यांना  आपला अमूल्य वेळ, पैसा आदी खर्च  करावा लागत असे; परंतु शासनाच्या निर्देशाप्रमाणे येत्या १५ ऑगस्टपासून डिजिटल स्वाक्षरी असलेला सात-बारा  ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. हे एक क्रांतिकारी पाऊल असल्याचे प्रतिपादन  पाण्डेय  यांनी केले. 
यावेळी शहीर मधुकर नावकार यांनी सातबारा संगणकीकरणबाबत पोवाडा सादर केला तसेच सात-बारासंबंधी जनजागृती करणारे पथनाट्य  नेहरू युवा केंद्राच्या  स्वयंसिद्ध  ग्रुपच्या खुशबू चोपडे  व त्यांच्या चमूने सादर केले. यामुळे सात-बारा जनजागृती कार्यक्रमात उत्साह निर्माण झाला.
यावेळी वृक्ष लागवड  व वृक्ष संगोपणासाठी उत्कृष्ट  काम करणार्‍या गावकर्‍यांच्या  शाळा संगणकीकृत करण्यासाठी लोकवर्गणी देणार्‍या ग्रामस्थांचा, वारकरी संप्रदायाच्या ग्रामस्थांचा, तसेच गुरुदेव सेवा मंडळाच्या  सेवेकर्‍यांचा, तसेच पत्रकार अनिल माहोरे यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
महसूल दिनानिमित्त  राष्ट्रीय कुटुंब लाभ  योजनेंतर्गत प्रभा गवई व गीता यमगवळी यांना २0 हजार रुपयांचा धनादेश  जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय  यांच्या हस्ते  देण्यात आला. 
क्रार्यक्रमाचे प्रस्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक दिलीप अंधारे, माजी सभापती लखुअप्पा लंगोटे, उपविभागीय  अधिकारी संजय खडसे यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन जिल्हाधिकारी कार्यालयाचे गुणवत्ता  समन्वयक प्रकाश अंधारे यांनी तर उपस्थितांचे  आभार नायब तहसीलदार श्यामला खोत यांनी मानले. 
 

Web Title: Bicycling, riding the carriage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.