मोठ्या भावानेच केली लहान भावाची हत्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 02:09 PM2019-06-24T14:09:22+5:302019-06-24T14:09:30+5:30
पोलिसांनी मोठ्या भावाला ताब्यात घेतल्यानंतर मनीष पाचपोर याच्या मृत्यू प्रकरणाची उकल झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: मद्यधुंद लहान भावाला मारहाण करून त्याचा अतिमद्य प्राशनाने मृत्यू झाल्याचे भासवून मोठ्या भावाने त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचा केलेला प्रयत्न डाबकी रोड पोलिसांनी उधळून लावला. पोलिसांनी मोठ्या भावाला ताब्यात घेतल्यानंतर मनीष पाचपोर याच्या मृत्यू प्रकरणाची उकल झाली. मोठ्या भावाने केलेल्या मारहाणीत गुप्तांगासह अंडकोषाला जबर मार लागल्याने मनीष पाचपोरचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्यावर पोलिसांनी शनिवारी रात्री त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला २५ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
डाबकी रोडवरील गणेश नगर येथे राहणाऱ्या मनीष पाचपोर (३५) याचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला होता. त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी गुलजारपुºयातील स्मशानभूमीत सुरू असतानाच, पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी संशयाच्या आधारे चितेवरूनच मनीषचा मृतदेह ताब्यात घेतला आणि मृतदेहाचे शवविच्छेदन केले. शवविच्छेदन झाल्यावर डॉक्टरांनी मनीषला मारहाण झाली असून, मारहाणीत त्याच्या गुप्तांगसह अंडकोषाला जबर मार लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी मनीषचा मोठा भाऊ योगेश प्रकाश पाचपोर (४0) याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यावर, योगेशने मनीष हा नेहमीच दारू पिऊन यायचा. आई-वडील, आत्याला अश्लील शिवीगाळ करायचा. त्याची मानसिक स्थितीही बरी नसायची. शुक्रवारी रात्री मनीष दारू पिऊन आल्यावर शिवीगाळ करीत होता. त्यामुळे त्याला मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांकडे कबूल केले आणि अतिमद्य प्राशनामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे भासवित, त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते, अशी माहिती योगेशने पोलिसांना दिली. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भादंवि कलम ३0२, २0१, २0२ नुसार गुन्हा दाखल करून त्याला शनिवारी रात्रीच अटक केली. रविवारी त्याला न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला २५ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)
योगेशला पश्चात्ताप, दु:खही नाही!
योगेश पाचपोर याला रविवारी दुपारी डाबकी रोड पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयात हजर केल्यानंतर योगेश शांत होता. लहान भावाची हत्या केल्याचा पश्चात्ताप, दु:खही त्याच्या चेहºयावर दिसत नव्हते.