भावाच्या छळाला कंटाळून मोठ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 01:11 AM2017-07-18T01:11:50+5:302017-07-18T01:11:50+5:30
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
हिवरखेड : शेतीच्या वादातून लहान भाऊ, त्याची पत्नी व मुलगा छळ करीत असल्याने मोठ्या भावाने विहीरीत आत्महत्या केल्याची घटना १७ जुलै राजी सकाळी उघडकीस आली. दोन्ही हात आणि पाय बांधलेल्या स्थितीत मृतदेह शेतशिवारातील विहिरीत आढळल्याने हत्या की आत्महत्या, याविषयी संभ्रम निर्माण झाला होता. या प्रकरणी रात्री उशीरा हिवरखेड पोलिसांनी तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
हिवरखेड येथील बारगणपुऱ्यातील रतन जयराम ताळे यांच्या शेतातील विहीरीत त्यांचा मोठा भाऊ विजय जयराम ताळे यांचा मृतदेह हात व पाय बांधलेल्या अवस्थेत आढळला. रतन ताळे यांच्या मालकीचे आठ एकर शेत असून, त्यातील दीड एकर शेतावरून दोन्ही भावांमध्ये काही वर्षांपासून वाद होता. त्यातूनच लहान भाउ रतन व त्याची पत्नी , मुलगा हे विजय ताळे यांचा छळ करीत होते.या छळाला कंटाळूनन त्यांनी विहीरीत आत्महत्या केल्याची फिर्याद सुरज विजय ताळे याने हिवरखेड पोलिसात दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी रतन जयराम ताळे, शोभा रतन ताळे व सागर रतन ताळे यांच्याविरुद्ध कलम ३०६,३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
घटनास्थळाला एसडीपीओ उमेश माने, स्थानिक गुन्हे शाखाप्रमुख कैलास नागरे, अकोटचे ठाणेदार छगन इंगळे, हिवरखेडचे ठाणेदार निशांत मेश्राम यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तेल्हारा येथे पाठवला. पुढील तपास हिवरखेड पोलीस करीत आहेत.