अजूनही ग्राहकांना दिली जातात जुनीच बिले
By admin | Published: July 6, 2017 01:32 AM2017-07-06T01:32:31+5:302017-07-06T01:32:31+5:30
जीएसटी : हेल्प डेस्क कार्यान्वित
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: जुलै महिन्यापासून देशभरात जीएसटी (वस्तू व सेवा कर) अंमलबजावणी सुरू होऊन आज चार दिवस झाले असले तरी अजूनही अकोल्यातील बाजारपेठेत सर्रास जुनेच बिल दिले जात आहे. स्वॉफ्टवेअर अपडेट नसल्याचे कारण पुढे करून ही ग्राहकांची फसवणूक होत असून त्यावर जीएसटीचा उल्लेख नाही. अकोल्यातील कापड उद्योग मोठा असून दररोज लक्षावधीची उलाढाल करणाऱ्या प्रतिष्ठानाकडून या चुका होत आहेत.
जीएसटी रिटर्न भरावयाची सूट शासनाने सप्टेंबरपर्यंत दिल्याने अनेक व्यापारी उद्योजक अजूनही स्वॉफवेअर अपडेटमध्येच अडकले आहेत. ग्राहकांना ते सर्रास जुने बिल देत आहे. या बिलांवर जीएसटीचा उल्लेख नसून, व्हॅट दर्शविला जातो आहे. विचारणा केली असता, काही फारसा बदल झालेला नाही केवळ व्हॅटऐवजी जीएसटी आला अशी सबब पुढे केली जात आहे.
त्यामुळे जीएसटीमध्ये नेमके बदल तरी काय, झाले हे समजायला सर्वसामान्य माणसाला मार्ग नाही. एकीकडे प्रसारमाध्यमामधून अमुक-टमुक वस्तू स्वस्त झाल्याचे ग्राहकाला कळत असले तरी वास्तविकतेत त्याचा लाभ चार दिवसात मिळालेला नाही. दरम्यान, सीए आणि संगणकाशी संबंधित प्रतिष्ठानांनी ४ ते १० हजारापर्यंतचे वेगवेगळे स्वॉफ्टवेअर बाजारात विक्रीला आणले आहे. यातील एकही स्वाफ्टवेअर जीएसटी कार्यालयाचे अधिकृत नाही. जीएसटीबाबत संभ्रम असल्यास केवळ कार्यालयातील हेल्प डेस्ककडून मार्गदर्शन केले जात आहे. नवीन नोंदणी आणि स्थलांतरित प्रकरणांसाठी व्यापारी उद्योजकांनी (mahagst.helpdesk@mahavat.gov.in) आणि जीएसटी कायद्यासंदर्भातील अडचणीबाबत (gstquerytrade@mahavat.gov.in) या मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन जीएसटी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.