दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर ‘बायोमेट्रिक मशीन’चा उतारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 12:35 PM2018-09-12T12:35:49+5:302018-09-12T12:37:12+5:30
दांडीबहाद्दर कर्मचाºयांसह शिक्षक व सफाई कर्मचाºयांना वेसण घालण्यासाठी महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी ‘बायोमेट्रिक मशीन’चा ठोस तोडगा काढला आहे.
अकोला : महापालिकेच्या काही कामचुकार व दांडीबहाद्दर कर्मचाºयांमुळे प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाºया इतर कर्मचाºयांच्या कार्यप्रणालीवर नाहक शंका उपस्थित केली जाते. यामुळे त्यांचे मनोधैर्य कमी होऊन त्याचा परिणाम कामकाजावर होतो. अशा दांडीबहाद्दर कर्मचाºयांसह शिक्षक व सफाई कर्मचाºयांना वेसण घालण्यासाठी महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी ‘बायोमेट्रिक मशीन’चा ठोस तोडगा काढला आहे. त्यासाठी निविदा प्रकाशित केली असून, काही कंपन्यांनी सादर केलेल्या निविदा लवकरच उघडल्या जाणार असल्याची माहिती आहे.
शहरात झोन कार्यालयांचे गठन होण्यापूर्वी महापालिकेत एकाच छताखाली प्रशासकीय कामकाज पार पडत होते. साहजिकच मनपात विविध कामानिमित्त येणाºया नागरिकांना वरिष्ठ अधिकारी, विभाग प्रमुख तसेच संबंधित कर्मचारी उपलब्ध होणे अपेक्षित होते; परंतु अनेक अधिकारी, कर्मचारी मनपाच्या प्रशासकीय कामाची सबब पुढे करून कामावरून पळ काढत असल्याचे चित्र होते. ही बाब लक्षात घेता प्रशासनाने झोन कार्यालयांचे गठन करून त्या ठिकाणी विद्युत, पाणी पुरवठा, कर वसुली, साफसफाई आदींसह विविध सुविधा उपलब्ध करून देत अधिकारी-कर्मचाºयांच्या नियुक्त्या केल्या, तसेच अधिकारी-कर्मचाºयांच्या दैनंदिन हजेरीसाठी मनपामध्ये ‘बायोमेट्रिक’ मशीन कार्यान्वित केल्या. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. यादरम्यान, झोन कार्यालयांवर नियुक्त केलेले कर्मचारी तसेच सकाळी शहरात दैनंदिन साफसफाई करणारे सफाई कर्मचारी कर्तव्यापासून पळ काढत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. अशा दांडीबहाद्दर कर्मचाºयांना वेसण घालण्यासाठी मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांनी आता झोन कार्यालयांमध्ये हजेरीसाठी अत्याधुनिक ‘बायोमेट्रिक’ मशीन लावण्याचा निर्णय घेतला आहे.
शिक्षकांना लागणार लगाम!
सकाळ किंवा दुपारच्या शालेय सत्रात काम करणारे शिक्षक-मुख्याध्यापक शाळा सुरू झाल्यानंतर काही वेळातच शाळेतून पळ काढतात. अशा शाळांची आकस्मिक पाहणी केली असता कुटुंबातील व्यक्तींच्या आजारपणाचे दाखले दिले जातात. मनपाचा शिक्षण विभाग काही विशिष्ट शाळांचीच तपासणी करण्यापुरता मर्यादित झाला असल्याने इतर शाळांवरील शिक्षक या बाबीचा फायदा घेतात. हा प्रकार लक्षात आल्यामुळे आयुक्त जितेंद्र वाघ यांनी मनपा शाळांमध्येही ‘बायोमेट्रिक’ मशीन कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून कामचुकार शिक्षकांवर लगाम लावल्या जाणार आहे.