जिल्ह्यात बर्ड फ्लूसंदर्भात सतर्कतेचा इशारा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:55 AM2021-01-08T04:55:35+5:302021-01-08T04:55:35+5:30
मागील काही दिवसांत अनेक राज्यांमध्ये बर्ड फ्लूच्या संसर्गामुळे पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास येत आहे. राज्यात आतापर्यंत बर्ड फ्लूमुळे एकाही ...
मागील काही दिवसांत अनेक राज्यांमध्ये बर्ड फ्लूच्या संसर्गामुळे पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास येत आहे. राज्यात आतापर्यंत बर्ड फ्लूमुळे एकाही पक्ष्याचा मृत्यू झालेला नाही, मात्र सतर्कता बाळगत शासनाने राज्यभरात अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार, जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. तुषार बावणे यांनी पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, जिल्ह्यात कुठेही पक्ष्यांचा अचानक मृत्यू झाल्यास त्याची माहिती पशुसंवर्धन विभागाला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
एखाद्या ठिकाणी अचानक अधिक संख्येने मृत पक्षी आढळल्यास ही बाब चिंताजनक असते. अशावेळी पक्ष्यांचे शवविच्छेदन न करता नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील हायसेक्युरिटी ॲनिमल डिसिज लॅबोरेटरी किंवा रोग अन्वेषण विभाग पुणे येथे सॅम्पल पाठवले जातात.
- डॉ. नम्रता वाघमारे, सहायक आयुक्त, पशुसंवर्धन विभाग, अकोला
निर्जंतुकीकरणावर भर
ग्रामपंचायत स्तरावर पक्ष्यांच्या खुराट्यांचे निर्जंतुकीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
मृत पक्ष्यांची होणार प्रयोगशाळेत तपासणी
जिल्ह्यात कुठेही मृत पक्षी आढळल्यास त्यांची तपासणी प्रयोगशाळेत करण्यात येणार आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत मृत पक्षी भोपाळ किंवा पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागातर्फे देण्यात आली आहे.