पक्षी निवडणूक : गायबगळा ठरला अकोल्याचा पक्षी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 05:00 PM2019-01-25T17:00:26+5:302019-01-25T17:04:09+5:30
अकोला : पहिल्यांदाच झालेल्या पक्षी निवडणूकीत गाय बगळा या पक्षाने पाच हजार १२६ मतांनी दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे या पुढे अकोल्याचा पक्षी म्हणून गाय बगळाची नवी ओळख निर्माण झाली आहे.
अकोला : पहिल्यांदाच झालेल्या पक्षी निवडणूकीत गाय बगळा या पक्षाने पाच हजार १२६ मतांनी दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे या पुढे अकोल्याचा पक्षी म्हणून गाय बगळाची नवी ओळख निर्माण झाली आहे. या निवडणुकीच्या रिंगणात पाच पक्षी असून, त्यासाठी ७० शाळेतील एकूण १७,८८५ विद्यार्थ्यांनी मतदान केले. विद्यार्थ्यांना निसर्गाची जाण व्हावी, तसेच शालेय जिवनातूनच जागरुक मतदार निर्माण व्हावा, या उद्देशाने अकोल्यात पहिल्यांदाच पक्षी निवडणूक घेण्यात आली. १५ ते २३ जानेवारी या कालावधीमध्ये विविध शाळांमध्ये राबविण्यात आलेल्या या निवडणुकीमध्ये पाच पक्षांमध्ये लढत झाली. यामध्ये राखी मनेष, हप्पू , सुमग, गायबगळा व काळा शराटी या पक्षांचा समावेश होता. गत आठवड्याभरात शहरातील ७० शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मतदान केले. निसर्ग कट्टा व निवडणूक विभागातर्फे या शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये वर्यावरण व मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली. जनजागृतीसोबतच विद्यार्थ्यांकडून निवडणुकीच्या रिंगणात उभ्या पक्षांसाठी मतदान करवून घेतले. या मतदानाचा निकाल राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवार २५ जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमात जाहिर करण्यात आला. त्यानुसार, गाय बगळा या पक्षाने पाच हजार १२६ मतांची आघाडी घेत अकोल्याचा पक्षी म्हणून मान मिळवला. पक्षी निवडणुकीसाठी निसर्ग कट्टा, सामाजिक वनीकरण, महाराष्ट्र पक्षी मित्र, आधार फाउंडेशन , अंजिक्य साहसी क्लब, मॅराथॉन नेचर क्लब, खंडेलवाल महाविद्यालय, शिवाजी महाविद्यालय, आरएलटी महाविद्यालय व सृष्टी वैभव या संस्थांसह पक्षी मित्र दीपक जोशी, उदय वझे, देवेंद्र तेलकर, संदीप साखरे, संदीप सरडे, अतुल जवळेकर, अजय फाळे यांनी सहकार्य केले.
असे पडले मत
पक्षी - मिळालेले मत
गाय बगळा ५१२६
सुबग ५०३३
हप्पू ३६७५
काळा तराटी २०८३
राखी धनेश १९६५
पाच वर्षांसाठी निवड
पहिल्यांदाच झालेल्या या पक्षी निवडणुकीत विजयी उमेदवार गाय बगळा हा पुढील पाच वर्षांसाठी अकोल्याचा पक्षी राहणार आहे. पुढच्या पाच वर्षानंतर पुन्हा पाच पक्षांमध्ये या प्रकारची निवडणूक लढविण्यात येणार आहे.