बिसेन यांची हत्याच; सलामसह तीन गजाआड
By admin | Published: July 7, 2015 01:45 AM2015-07-07T01:45:19+5:302015-07-07T01:45:19+5:30
दहा लाखांची खंडणी न दिल्याने कारखाली चिरडले.
अकोला: कुख्यात गँगस्टर सलाम खान करीम खान व त्याचे साथीदार इलियास, रिजवान व विजेंद्र कुरील यांनी रविवारी सायंकाळी प्रकाशसिंग बिसेन यांची कारखाली चिरडून हत्या केली. आरोपींचा बिसेन यांच्यासोबत दीडवर्षांपासून कानडी शेतशिवारातील शेतीवरून वाद सुरू होता. आरोपी सातत्याने बिसेन यांना शेतीवर ताबा करण्याची धमकी देत होते आणि १0 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करीत होते; परंतु बिसेन यांनी दाद न दिल्याने सलाम खानने कारखाली चिरडून त्यांची हत्या केली. या प्रकरणी आकोट फैल पोलिसांनी सोमवारी पहाटे गुन्हा दाखल करून तीन आरोपींना अटक केली. न्यायालयाने त्यांना १0 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. प्रकाशसिंग बिसेन यांच्या शेतावर काम करणारा शेतमजूर रामेश्वर प्रल्हाद पवार (३८ रा. सांगवी मोहाडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बिसेन, यांचा आरोपी सलाम खान करीम खान व त्याच्या साथीदारांसोबत शेतीवरून वाद सुरू होता. आरोपी अधूनमधून येऊन बिसेन यांना त्रास द्यायचे. जीवे मारण्याच्या धमक्या द्यायचे. रविवारी सायंकाळच्या सुमारास प्रकाशसिंग बिसेन हे शेतावरील पोल्ट्रीफार्मवर आले. शेतालगतच्या रस्त्यावर खुर्चीवर ते बसले असताना, आरोपी सलाम खान, इलियास, रिजवान व विजेंद्र कुरील हे एमएच २७ एआर 0५७५ क्रमांकाच्या कारने शेतावर आले. त्यांनी बिसेन यांना शेतावर ताबा करण्याची धमकी देत १0 लाख रुपयांची मागणी केली; परंतु त्यांनी स्पष्ट नकार दिल्याने आरोपींनी बिसेन बसलेल्या खुर्चीच्या दिशेने कार नेत त्यांना चिरडले. यात गंभीर जखमी झालेले बिसेन यांना रविवारी उशिरा सायंकाळी खासगी रुग्णालयात दाखल केले; परंतु डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. आकोट फैल पोलिसांनी रात्रीच सलाम खानसह तिघांना ताब्यात घेतले. सोमवारी पहाटे आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३८४, ३८७, ३0२, १२0 (ब) नुसार गुन्हा दाखल केला.